GM NEWS, ह्रदयद्रावक वृत्त : पहूरच्या भाजीपाला विक्रेत्या महीलेसह मुलाचा शिवना – मादणी मार्गावर झालेल्या अपघातात दुर्देवी मृत्यू . अपघातात बचावलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर जळगांव येथे उपचार सुरु . मादणी येथील दुचाकीस्वारासह अन्य १ जण गंभीर जखमी . माय -लेकाच्या मृत्यूने पहूर परिसरावर शोककळा . रात्री ९ वाजता पहूर येथे होणार अंत्यसंस्कार .

0
2977

पहूर , ता जामनेर, दि. ११ ( शंकर भामेरे )
कोरोनाशी यशस्वी लढा देवून घरी परतलेल्या पहूर येथील भाजीपाला विक्रेत्या महिलेसह मुलाचा शिवना – मादणी मार्गावर झालेल्या अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज रविवारी (ता .११) दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली .यात त्यांची चिमुकली नात ऐश्वर्या जखमी झाली असून तीला जळगांव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की , मालताबाई सुभाष थोरात यांची लहान सुन शितल सागर थोरात यांचे माहेर लाखनवाडा (जि. बुलढाणा ) येथे आहे. बाळंतपणानंतर माहेराहून सूनेला पहूर गावी आणण्याकरीता आज रविवारी सकाळी मालताबाई त्यांच्या स्वतः च्या पॅजो मालवाहू गाडीने मुलगा सागर व नात ऐश्वर्या यांच्यासह लाखनवाडा येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या .
प्रवास सुरु असतानाच शिवना – मादणी मार्गावर समोरून आलेल्या दुचाकी ( एम . एच . २० एफ . ६४ ८१ ) आणि लाखनवाड्याकडे जाणाऱ्या त्यांच्या पॅजो ( एम . एच . १९ .३३७२ ) यांच्यात जोरदार धडक झाली . या अपघातात मालताबाई सुभाष थोरात ( वय – ५०वर्षे ) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . तर त्यांचा मुलगा पॅजो चालक सागर थोरात ( वय २५ ) यांची जळगांव येथे उपचारार्थ दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली . सुदैवाने ७ वर्षांची चिमुकली ऐश्वर्या थोरात या अपघातातून बचावली असून दुचाकी वरील दोघे जण ( रा . मादणी ) जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली . आजूबाजूच्या लोकांनीही अपघातग्रस्तांना दवाखान्यात नेण्यासाठी तातडीची मदत केली . याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . मादणी येथील जखमींना औरंगाबाद येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे .

पतीचा आक्रोश –
मालताबाई या बाजारात भाजीपाला विकून कुटुंबाचा चरितार्थ चालवित होत्या . सागर हा सुद्धा आई – वडीलांना मदत करायचा . पतीच्या खांद्याला खांदा लावून मालता बाईंनी भाजीपाला विक्री व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण केली होती . अपघाताची वार्ता समजताच पती सुभाष थोरात यांच्या सह मुलाने एकच आक्रोश केला . तीन महीन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती . कोरोनावर यशस्वी मात करून मालता बाई घरी आल्या होत्या. कोरोनाला हरविले .. पण अपघाताने नेले अशीच दुर्देवी परिस्थिती त्यांच्या बाबतीत घडली असून या हृदयद्रावक घटनेने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . पहूरच्या आज रविवारच्या आठवडे बाजारावर शोककळा पसरली आहे