GM NEWS, नोकरी – स्वंयरोजगार वार्ता : परागीभवनातून जगातील एक तृतीयांश लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागविणाऱ्या बहुगुणी मधमाशांना वाचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे . – विद्यानंद आहिरे,मधमाशापालन तज्ञ तथा मधउद्योजक.

0
150

धुळे,दि.१६ ( एकनाथ कोळी ) : –
परपरागीभवनातून जगातील एक तृतीयांश लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागविणारी मधमाशांची महत्वाची भूमिका असून मधमाशी वाचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा,असे मार्गदर्शन मधमाशा तज्ञ, विद्यानंद अहिरे यांनी नुकत्याच गोंदूर येथे संपन्न झालेल्या एकदिवसीय मधमाशीपालन प्रशिक्षण कार्यशाळेत केले.
राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण ढालसिंगी आयोजित तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, विद्यासागर नॅचरल प्रोडक्टस् चमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय मधमाशीपालनाची प्रशिक्षण कार्यशाळा धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथील चांडक फार्मवर संपन्न झाली.
खांदेशातील धुळे,जळगांव, नंदुरबार तीनही जिल्ह्यांतील शेतकरी तसेच नव उद्योजकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.या एकदिवसीय कार्यशाळेत मधमाशांच्या विविध जातींची ओळख, मधमाशांचे प्रकार, भारतीय सातेरी,मेलीफेरा मधमाशा या पाळीव मधमाशांचे शास्त्रीय पद्धतीचे पालनविषयी मार्गदर्शन करण्यात आले. मधमाशांपासून मिळणारी खाद्य उत्पादने जसे मध,परागकण व राँयल जेली यांचे काढणीची पद्धती तसेच आहारातील , आयुर्वेदीक, व सौंदर्य प्रसाधनातील वापराचे महत्व,मधमाशांनी शरीरातून स्रवलेल्या मेण व प्रोपोलिस,जहर या अखाद्य श्रीमंत उत्पादनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मधमाशा पालन व्यवसायासोबत व परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात हमखास ,तसेच भरघोस वाढ होण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत प्रती एकर क्षेत्रासाठी तीन मधमाशा वसाहती ठेवल्या पाहिजे, असे मार्गदर्शन राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे सचिव, सागर पाटील यांनी या कार्यशाळेत केले.मधमाशापालन व्यवसायात महिलांचा सहभाग सुद्धा अधिक महत्त्वाचा आहे, युवक-युवतींनी मधमाशा पालन करुन मधउद्योजक होण्याची सुमधूर संधी आहे,याविषयी अमरावती येथील मधपालक तथा महिला उद्योजक कु.योगिता इंगळे ह्यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या खादी व ग्रामोद्योग विभागाकडून मधपालकांसाठी विविध अनुदान योजना असून त्याचा लाभ प्रशिक्षणार्थींनी घ्यावा,असे आवाहन धुळे जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी, ए.बी. नेवे यांनी केले. प्रशिक्षणामध्ये मधूबन भेटीत मधमाशा वसाहतीची प्रत्यक्ष हाताळणी व मधूबन व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.एकदिवसीय मधमाशा पालन व्यवसाय प्रशिक्षण सहभागी असणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांचे हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्रचे वाटप करण्यात आले.या एकदिवसीय कार्यशाळेत महिला व पुरूष सहभाग नोंदवला होता, तसेच राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे सचिव तथा मधमाशापालक सागर पाटील यांनी प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप केला.