तब्बल २४ वर्षा नंतर एल .आय.सी मधे मेगा नोकर भरती .

0
234

जामनेर दि .१९ (मिलींद लोखंडे ) : – एल.आय.सी. ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. संपूर्ण देशामध्ये एल.आय.सी. च्या ३५०० हून अधिक शाखा आहेत. पूर्णत: सरकारी मालकीची असलेली एल.आय.सी. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठे योगदान देत आहे. गेल्या वीस वर्षामध्ये विशेषत: विमा क्षेत्राचे खाजगीकरण झाल्यावर एल.आय.सी.च्या व्यवसायाचा प्रचंड विस्तार झाला आहे. आजमितीला एल.आय.सी.चे तीस कोटीहून अधिक पॉलीसीहोल्डर आहेत.

एल.आय.सी.मध्ये १९९५ नंतर फारशी नोकर भरती झालेली नव्हती. इ.स. २०१९ साली एल.आय.सी.ने असिस्टंट क्लार्क या पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम जाहिर केली आहे. संपूर्ण देशामध्ये सुमारे ८००० हून अधिक पदांसाठी ही भरती होणार आहे. १८ ते ३० वयोगटातील युवकांसाठी ही फार मोठी सुवर्णसंधी आहे. असिस्टंट भरती पदासाठी परीक्षा होणार असून त्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन परीक्षा आहेत. परीक्षेनंतर मुलाखत द्यावी लागणार नाही. फक्त परीक्षा देवून थेट एल.आय.सी. मध्ये नोकरी मिळवण्याची ही फार मोठी संधी यावेळी उपलब्ध झाली आहे. याचा अर्थ केवळ गुणवत्तेवर आधारीत ही भरती केली जाणार आहे.

असिस्टंट पदासाठी वयोमर्यादा १८ वर्षे ते ३० वर्षे एवढी आहे. नियमांनुसार मागासवर्गियांसाठी वयामध्ये सवलत आहे. किमान शैक्षणिक पात्रता कोणत्याही विषयातील पदवी ही आहे. असिस्टंट पदाच्या पूर्व परीक्षांसाठी पुढील विषय आहेत. १) रिझनिंग अ‍ॅबिलिटी २) न्युमरीकल अ‍ॅबिलिटी ३) इंग्रजी

ही परीक्षा ऑनलाईन होणार असून परीक्षेसाठी दोन तास इतका कालावधी आहे. बहूपर्यायी प्रश्न आणि उत्तरे असे परीक्षेचे स्वरूप आहे. ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१९ ही आहे. असिस्टंट पदाच्या परिक्षेसाठी फक्त ऑनलाईनच अर्ज करता येणार आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण देशात परीक्षा केंद्रे असून महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, पणजी, इ. ठिकाणी परीक्षा होणार आहे.

असिस्टंट पदी निवड झाल्यावर सुरुवातीचा पगार दरमहा सुमारे ३०,०००/- एवढा मिळणार आहे. याशिवाय घर भत्ता, कन्व्हेयन्स, गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर अधिक सुविधा उपलब्ध आहेत. असिस्टंटपदी सुरुवात करुन भविष्यात इंटर्नल परीक्षा देवून एल.आय.सी. मध्ये उज्वल करीअर आणि प्रगती करता येते. जस जशी देशाची आर्थिक प्रगती होते तस तसा विमा आणि बॅंकिंग क्षेत्राचा आधिकाधिक विस्तार होतो हा जगभराचा अनुभव आहे. आज अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स या देशांनंतर भारत ६व्या क्रमांकाची जागतिक अर्थसत्ता आहे. आजमितीस भारताची अर्थसत्ता ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थसत्ता आहे. त्यामुळे एल.आय.सी. मधील करीअर हे भविष्यातील समृद्ध आणि उज्ज्वल करीअर आहे, याची खात्री प्रत्येकाने बाळगावी. या परिक्षेच्या निमित्ताने एल.आय.सी. मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी युवकांना उपलब्ध झाली आहे.

एल.आय.सी. मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नॅशनल ऑरगॅनायझेशन ऑफ इंश्युरन्स वर्कर्स म्हणजे NOIW या संघटनेने असिस्टंट पदासाठी विशेष प्रकारचे स्टडी मटेरीअल तयार केले आहे. त्यामध्ये तीन विषयांचे आणि मॉक टेस्ट असे ४ विभाग आहेत. संघटनेने इन्शुरन्स अकॅडमी पुणे यांच्या सहकार्याने मुंबई येथे दादर आणि बोरिवली, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, सातारा, अलिबाग, सांगली, सोलापूर, पणजी आणि देशात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी मार्गदर्शनपर प्रशिक्षण वर्गही सुरू केले आहेत. एल.आय.सी.च्या असिस्टंट क्लार्क पदासाठीच्या भरती संबंधी संपूर्ण माहिती www.licassistant.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिकाधिक मराठी युवकांनी एल.आय.सी. मध्ये यशस्वी करीअर करावे म्हणून संघटनेने हा उपक्रम सुरू केला आहे. अधिक माहितीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.