GM NEWS, FLASH: जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे निर्देश .

0
381

जळगाव,दि.26 ( मिलींद लोखंडे ) : –
रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरीकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल अथवा पारोळा याठिकाणी ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागास तातडीने प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेत.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे निर्देश दिलेत. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनग्रा, उप अभियंता श्रीमती स्वाती भिरुड यांचेसह महापालिका, एसटी आदि विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, मोठ्या आस्थापना, एमआयडीसीमधील उद्योग, बँका, विद्यापीठ, महाविद्यालयात विविध कामासाठी येणारे नागरीक, विद्यार्थी यांना नो हेल्मेट, नो एंन्ट्री हे तत्व अवलंबण्याच्या सुचना द्याव्यात. यासाठी या सर्व आस्थापनांना तसे लेखी निर्देश देण्यात यावेत. त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या बसेस ह्या थांब्यावर न थांबता इतरत्र थांबतात त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा यापुढे बसेस ह्या थांब्यावरच थांबविण्याच्या सुचना देण्यात आल्यात. महामार्गावर ओव्हरटेक करताना अनेक अपघात होतात याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपघाताची स्थळे दर्शविणारे फलक रस्त्यांवर तात्काळ लावण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

मागीलवर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण 23 टक्क्यांनी घटले आहे. ऑगस्ट -2019 पर्यंत जिल्ह्यात 589 अपघातात 308 व्यक्तींचा मृत्यु झाला होता तर 593 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. ऑगस्ट-2020 मध्ये 453 अपघात झाले असून यात 301 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे तर 332 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत 106 अपघात झाले आहे. सर्वाधिक 12 अपघात हे पारोळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले आहे तर त्यानंतर चाळीसगाव ग्रामीण 11, मेहुणबारे, जळगाव एमआयडीसी हद्दीत प्रत्येकी 10 अपघात झाले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी बैठकीत दिली.

झालेल्या अपघातांच्या ठिकाणांचे निरिक्षण करुन वारंवार एकाच ठिकाणी अपघात होत असतील तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट ठरविण्यासाठी त्यांची संयुक्तपणे पाहणी करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्यात. तरसोद-चिखली रस्त्यांचे काम गतीने सुरु असून फागणे-नशिराबाद रस्त्याचे कामही वेगाने पूर्ण करावेत. काम सुरु असतांना वाहनचालकांसाठी आवश्यक त्या सुचना, चिन्हे रस्त्यावर लावण्याचे निर्देशही देण्यात आले. महानगरपालिका हद्दीतील रसत्याच्या मधोमध अथवा कडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोल स्थलांतर करणे, सदोष वाहनांवर कारवाई करणे, त्याचबरोबर जळगाव-धुळे रस्त्यांवरील खड्डे राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरीत भरण्यात यावेत. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यांवर झाडांच्या फांद्या वाढल्यामुळे अपघात होतात यावरही कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत देण्यात आल्यात.