खाजगी व सार्वजनिक मालमत्ता विनापरवाना विद्रुप केल्यास होणार तीन महिन्यांचा तुरूंगवास .

0
231

जळगाव दि. 21 ( एकनाथ शिंदे ) : – भारत निवडणुक आयोग, नवी दिल्ली यांनी दि.२१ सप्टेंबर,2019 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 ची घोषणा केलेली आहे. या तारखेपासून निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सुरु झालेली आहे.

दि.महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डिफेसमेंन्ट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 व भारत निवडणुक आयोग दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश व निर्देश अन्वये विना परवाना खाजगी व सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे,घोषणा लिहिणे, अथवा निवडणुक चिन्हे लिहून व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे. दि.महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डिफेसमेंन्ट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयापर्यंत दंड अशा दोन्ही शिक्षेस संबधीत इसम पात्र राहील.

आचार संहितेच्या या बाबींची अंमलबजावणी करणे हे आपणा सर्वाचे कर्तव्य आहे. ग्राम पंचायत, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगर पालिका तसेच इतर शासकीय / निम शासकीय विभागांच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित होणार नाही याची दक्षता घेणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत मा.भारत निवडणुक आयोगाचे सक्त आदेश आहेत. शासकीय / निम शासकीय मालमत्ता अथवा खाजगी मालमत्ता राजकीय पक्षांकडून विद्रुपित केलेली असल्यास या मालमत्ता तातडीने स्वच्छ करणे आवश्यक असून कायद्यानुसार त्वरीत योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. याकरिता आपल्या विभागामार्फत ही कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात यावी.

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालये व त्यांचा परिसर, सर्व सार्वजनिक ठिकाणे, मालमत्ता आणि सर्व खाजगी मालमत्तेवर विना परवाना लावलेले पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स, लिहीलेल्या घोषणा अथवा निवडणुक चिन्हे काढून टाकल्याबाबतचे प्रमाणपत्र सर्व संबधीतांनी अनुक्रमे दि.22 सप्टेंबर, 2019 (24 तासात ), दि.23 सप्टेंबर,2019 (48 तासात ) आणि दि.24 सप्टेंबर,2019 (72 तासात) रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचेकडेस हार्ड कॉपी व ईमेल homebranchjalgaon@gmail.com वर पाठविण्यात यावे.

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबधीताविरुध्द लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी. असे आवाहन डॉ.अविनाश ढाकणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी,जळगाव यांनी केले आहे.