जळगांव दि,२४ (एकनाथ शिंदेे )-: भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेच्या नियमांचा भंग होवू नये यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. अश्या सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सकाळी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार श्री. मोरे, श्री. कळसकर यांचेसह विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे नियम सर्वांनी समजून घ्यावे. सर्व राजकीय पक्षानी पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून टाकावेत. प्रचार साहित्य लावण्यापूर्वी संबंधित यंत्रणेची परवानगी घ्यावी. उमेदवारांचा प्रचार करतांना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घ्यावात. विनापरवानगी कुठलेही प्रचार साहित्य, वाहने, सभा, बैठका घेवू नये. उमेदवारांचा वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स् मिडीया, सोशल मीडियावर प्रचार करतांना माध्यम समन्वय व सनियंत्रण समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. वर्तमानपत्रातील जाहिराती प्रमाणित करुन घ्याव्यात. विना परवानगी जाहिराती प्रसिध्द केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगून उमेदवारांचा खर्चाचा दैनंदिन अहवाल निवडणूक शाखेस सादर करावा. त्याचबरोबर राजकीय पक्षांचे प्रचार कार्यालय सुरु करतांना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. विधानसभेच्या निवडणूका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थित प्रतिनिधींना निवडणूक काळात काय करावे, काय करु नये याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कदम व उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हुलवळे यांनी दिली.