GM NEWS, BIG BREAKING: बोदवडच्या तहसीलदारांसह मंडळाधिकारी व तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात . दोन लाखांची लाच घेताना महसुलचे त्रिकुट जेरबंद. जळगाव एसीबीच्या कारवाईने खळबळ

0
2328

बोदवड,दि. १८ (विशेष प्रतिनिधी ) : –
तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर शेती करण्यासाठी दोन लाखांची लाच मागणार्‍या बोदवड तहसीलदारांसह सर्कल व तलाठ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. बोदवड तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तहसीलदार हेमंत पाटील, तलाठी निरज पाटील व मंडळाधिकारी संजय शिरनाथ अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बोदवड तालुक्यातील एका तक्रारदाराने 2002 मध्ये पत्नीच्या नावावर शेती खरेदी केली होती मात्र काही वर्षांनी ती पुन्हा मूळ मालकाच्या नावावर आपोआप झाल्यानंतर तक्रारदाराने मंडळाधिकार्‍यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर पुन्हा तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर शेती करण्यात आली मात्र तहसीलदार यांनी या बाबीस आक्षेप घेत नोटीस काढली व कागदपत्रांमधील त्रृट्या असल्याने ही शेती सरकारजमा होईल, अशी भीती घातली. याचदरम्यान मंडळाधिकारी व तलाठी यांच्यामार्फत नोटीस रद्द करून शेती नावावर करण्यासाठी पाच लाखांची लाच मागण्यात आली मात्र दोन लाखात तडजोड करण्याचे ठरले व तक्रारदाराने तक्रार दिली.

पडताळणीनंतर सापळा केला यशस्वी
तहसीलदारांसह मंडळाधिकारी व सर्कल यांच्याविरुद्ध तक्रार असल्याने सुरूवातीला तलाठी व मंडळाधिकारी यांच्या लाच मागणीबाबत पडताळणी करण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी दोघांमार्फत लाच मागणी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी सापळा रचण्यात आला. तहसीलदारांच्या क्वार्टरची झडती घेण्यात आली तर दुसरे पथक जामनेर येथे रवाना झाल्याचे समजते. मंडळाधिकार्‍यांनी लाच स्वीकारताच सुरूवातीला त्याच्या व नंतर दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यात आला.