GM NEWS,ग्राम रणधुमाळी : हायटेक प्रचारासोबतच आदर्श ग्रामपंचायत घडवणाऱ्या जाहिरनाम्याची सर्वत्र चर्चा .

0
110

तोंडापुर,दि.१३( एकनाथ कोळी /विद्यानंद आहिरे ) : –
राज्यात सध्या 14234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी लाखो रुपयांची बोली लावल्याने अनेक ग्रामपंचायती यावेळी चर्चेचा विषय देखील ठरल्या आहेत.

अशा या राजकीय डावपेचात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य हे लोकशाहीचे मुद्दे मात्र कालबाह्य ठरतात की काय असे वातावरण निर्माण झाले होते.

अशा या घोडेबाजार आणि गोंधळाच्या वातावरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात वसलेलं कुंभारी बुद्रुक हे एक छोटंसं गाव मात्र निवडणूक प्रचार- प्रसारात आधुनिक तंत्रज्ञान वापरतांना दिसत आहे आणि या गावातील प्रभाग 3- अ चे अपक्ष उमेदवार प्रभाकर साळवे ह्यांनी गावासाठी पुढील पाच वर्षात कोणकोणती कामे त्यांच्याकडून प्रभाग आणि गावासाठी करण्यात येतील याबाबत एक आदर्श वचननामा जाहीर केला आहे.

हायटेक प्रचारासोबतच आदर्श ग्रामपंचायत घडवणाऱ्या या जाहिरनाम्याची सध्या राज्यात सर्वत्र चर्चा होत आहे.

अपक्ष उमेदवार प्रभाकर साळवे यांच्या वडिलांचं 3 महिन्यांपूर्वी हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं होतं आणि निवडणुकीत उमेदवारी पक्की झाल्याच्या एक दिवसानंतर म्हणजे 5 जानेवारीला या उमेदवाराच्या आईचं देखील कँसर या दुर्धर आजाराने निधन झालं.

या दोनही दुःखद प्रसंगातून स्वतःला सावरत उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि सगळ्यात अगोदर त्यांनी मुद्दा घेतला तो आरोग्य सुविधेचा गावात कायमस्वरूपी रुग्णवाहिका, अल्पदरात प्राणवायू (ऑक्सिजन) सुविधा, प्राथमिक उपचार केंद्र, दर सहा महिन्याला गावातील सर्व नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि दुर्धर आजारातील रुग्णांना स्वनिधी, सामाजिक उत्तर दायित्व निधी आणि लोकवर्गणीतून पाच हजार रु पर्यंत मदत राशी उपलब्ध करून देण्याचे वचन या उमेदवाराने दिले आहे.

सोबतच गावात मुक्कामी एसटी बस नसल्यामुळे रात्री-अपरात्री किंवा भल्या पहाटे तात्काळ किंवा काही समस्या आल्यास गावातुन ये-जा करण्यासाठी मुक्कामी बस सुविधा सुरू करण्याचे देखील त्यांनी निश्चित केले आहे.

याशिवाय दर आठवडयाला प्रभागात साफ- सफाई, निर्जंतुकीकरण करण्याचे आणि सर्वांचं आरोग्य सर्वोतोपरी जपण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.

गावांत एटीएम आणि बँक सुविधा नसल्याने रात्री- अपरात्री किंवा अडचणीच्यावेळी पैसे बचत करणे, पैसे पाठवणे किंवा पैसे मागवणे आणि महत्वाचे म्हणजे पैसे जवळ बाळगणे ह्या समस्या सोडविण्यासाठी गावात पतसंस्था, खाजगी बँक आणि एटीएम सुविधा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.

गावात मोफत वायफाय सुविधा, व्यायामशाळा, वाचनालय, योग साधना आणि विपश्यना केंद्र, कृषी अवजारे बँक, बियाणे बँक, 80 प्रकारचे ग्रामीण उद्योग- व्यवसाय यासारख्या विकास कामांना आपल्या जाहीरनाम्यात त्यांनी प्राधान्य दिले आहे.

मागील 20 वर्षात 4 वेळेस गावांत बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या परंतु यावेळी 7 पैकी 6 प्रभागात बिनविरोध निवड झाली तर या एका वॉर्डासाठी अटीतटीची लढत होणार आहे.

जेमतेम पंधराशे लोकसंख्या असलेल्या या 7 सदस्यांच्या ग्रामपंचायतीत मतदारांना मात्र गावासाठी गुप्त पद्धतीने मतदान करून लोकप्रतिनिधी निवडण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळे यावेळी या एकमेव प्रभागात गावकरी दुरदृष्टिकोन, आधुनिक तंत्र, विकासकामे, हक्क आणि कर्तव्य ह्या बाबींना निवडणार की बगल देणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष्य लागलेले आहे.

विशेष म्हणजे छोट्याशा गावाच्या या निवडणूक कार्यक्रमासाठी
अहमदाबाद (गुजरातमधील) एका निवडणूक व्यवस्थापन कंपनीने
फेसबुक, व्हाट्सअप्प, युट्युब, शॉर्ट व्हिडीओ, बल्क मेसेज, रेकॉर्डेड व्हॉइस कॉल, पेज मॅनेजर, बूथ मॅनेजमेंट, इलेक्शन वॉर रूम या सारख्या सर्व सुविधा वापरून मतदारांना जागृक करण्याचे काम देखील केले आहे.

राज्यात एकीकडे पद, पैसा, प्रतिष्ठा आणि पक्ष असे विदारक चित्रं आहे तर दुसरीकडे आदर्श ग्रामपंचायत व्हावी म्हणून लोककल्याणाचा, लोकजागृतीचा हा वचननामा आहे.

ह्या गावातील प्रचार, प्रसार आणि जाहीरनामा पाहता ग्रामपंचायत निवडणूकित राज्यामध्ये कुंभारी गावच्या या उमेदवाराने सर्वांचे लक्ष्य वेधले आहे. *हायटेक प्रचारासोबतच आदर्श ग्रामपंचायत घडवणाऱ्या जाहिरनाम्यासाठी ही ग्रामपंचायत आता समाज माध्यमात चर्चेत आली आहे.