GM NEWS , गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील पहूर येथे चाकुचा धाक दाखवून धाडसी घरफोडी . एक लाख सोळा हजाराचा ऐवज लंपास . चोऱ्यांचे सत्र सुरूच; अवैध धंदेही बोकाळले .

0
593

पहूर , ता. जामनेर ,दि .११ (प्रतिनिधी ) :- येथील पोलीस ठाण्याला लागुनच असलेल्या महेश छाजेड नगरात अज्ञात चोरट्यांनी महिलेला चाकुचा धाक दाखवत एक लाख सोळा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की , महेश छाजेड नगरातील रहिवासी भागवतराव गायकवाड यांच्या पत्नी भारतीबाई ह्या बुधवारी मध्यरात्री लघुशंकेसाठी मागच्या दाराने बाहेर आल्या असता भिंतीआड लपून बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून महिलेला चाकुचा धाक दाखवत स्वयंपाक खोलीतील कपाटातून एक लाख सोळा हजार रुपये किमतीचे दागिने व पैसे काढून घेतले. हा ऐवज लुटुन नेतांना चोरट्यांनी महिलेला जोरदार धक्का दिला. धक्का देताच महिला बेशुध्द पडली. चोरटे दागिने घेऊन पसार झाले. ही घटना घडत असतांना महिलेचे पती घरातच झोपलेले होते. परंतु चाकुचा धाक दाखविल्याने महिलेला आरडाओरड करता आली नाही. सकाळी पती उठल्यानंतर सदरील प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे ,पोलिस निरिक्षक राहूल खताळ , बीट हवलदार शशीकांत पाटील ,श्रीराम धुमाळ यांनी पाहणी केली. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात भारतीबाई भागवतराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गु.र. नंबर ४९/२१ भा.दं.वि. कलम ४५७,४५८,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पहूर परिसरात दिवसेंदिवस चोरींच्या घटनात वाढ होत आहे. अवैध व्यवसाय फोफावल्याने चोरींच्या घटनेत वाढ होत असल्याचे सुज्ञ नागरिकांचे मत आहे.सर्रास सुरू असलेले अवैध व्यवसाय पोलिसांनी बंद करावेत. नागरी वस्त्यांमध्ये गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.