GM NEWS , हृदयस्पर्शी वृत्त : आईच्या पार्थिवाला खांदेकरी बनून चौघं मुलींनी दिला अग्नीडाग . जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील हृदयस्पर्शी घटना . मुलीच बनल्या ‘ वंशाचा दिवा ‘

0
1136

पहूर , ता .जामनेर , दि . २६( शंकर भामेरे ) : – कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून पूढील उपचार घेत असलेल्या वृद्ध आईची प्राणज्योत मालवल्यानंतर चौघं बहिणी आईच्या खांदेकरी बनल्या अन जड अंतकरणाने त्यांनी अग्नीडागही दिला . ही हृदयद्रावक घटना आहे पहूरपेठ येथील जोशी कुटुंबातील . मुलांची जागा मूलींनी घेत त्यांनी आईला अखेरचा निरोप दिला . यावेळी उपस्थितांची मने हेलावून गेली .
पहूर येथील आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सुहासिनी वसंतराव जोशी यांना मागील पंधरवड्यात कोरोनाची लागण झाली होती . जळगांव येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली . रुग्णालयातच पुढील उपचार सुरू असताना मात्र त्यांची प्रकृती खालावली आणि काल ( ता .२५ ) त्यांची प्राणज्योत मालवली .
आज (ता. २६ ) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पहूर पेठ येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . यावेळी त्यांच्या अपर्णा जोशी , प्रज्ञा जोशी ,नमिता जोशी आणि प्राची जोशी ( पुतणी ) या चौघं मुली त्यांच्या खांदेकरी बनून त्यांनी अग्नीडाग दिला . या पूर्वीही वडिल वसंत पंढरीनाथ जोशी यांच्या मृत्यू प्रसंगी त्यांनी वडिलांना अग्नी दिला होता .
मूलींनाच मुलांप्रमाणे मानून त्यांना शिक्षण देत जोशी कुटुंबीयांनी नवा आदर्श निर्माण केला . ज्येष्ठ कन्या अपर्णा जोशी या मुंबईत चेंबुर गुन्हे शाखेला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत . द्वितीय कन्या प्रज्ञा जोशी या सिंधुदूर्ग जिल्ह्यात शिक्षण अधिक्षक पदी धुरा सांभाळत असून तृतीय कन्या अॅड .नमिता जोशी या पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत , तर प्राची जोशी ( पुतणी )या नाशिक येथे अॅग्रो कंपनीत सेवारत आहेत .
वंशाला दिवा हवा म्हणून मुलगाच पाहीजे हा बुरसटलेला विचार दूर करून समाजाने मुलींना जन्म घेण्याचा हक्क देऊन त्यांना योग्य शिक्षण दिले तर मुली या नक्कीच मुलांपेक्षा एक पाऊल पुढेच राहतात , याचीच अनुभूती या प्रसंगी उपस्थितांना आली .