GM NEWS, आवाहन वृत्त: गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन .

0
150

जळगाव, दि. 9 ( मिलींद लोखंडे ) : –
महाराष्ट्र शासनाने सन 2021-22 या वर्षाकरीता अपघातग्रस्त शेतकऱ्यास/त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरीता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जळगाव जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभाग घेण्याची कालावधी हा 7 एप्रिल, 2021 ते 6 एप्रिल, 2022 असा आहे.
शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/त्यांच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्याकरीता जळगाव जिल्ह्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणताही 1 व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 जणांकरीता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
संपर्कासाठी सर्व तालुका कृषि अधिकारी कार्यालये, उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगाव यांचेशी तसेच विमा कंपनी दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरंन्स लि. मुंबई व विमा सल्लागार कंपनी मे. ऑक्झिलियम इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि. नवी मुंबई दूरध्वनी क्रमोक 022/27650096, टोल फ्री नं. 1800 220 812 ईमेल gmsa21@auxilliuminsurance.com वर संपर्क साधावा.
जिल्ह्यात गेपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021-22 राबविण्यात येत आहे. तरी या विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.