GM NEWS :गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील गोंदेगाव आणि हिवरी येथे दारु अडड्यांवर पहूर पोलिसांचे छापे . अवैध दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल . पहूर परिसरात बिनदिक्कतपणे विकले जाणारे दारूचे फुगे बंद करण्याची मागणी .

0
391

पहूर , ता .जामनेर दि ५(शंकर भामेरे ) :- पहूर पोलिस ठाण्यांतर्गत गोंदेगाव आणि हिवरी शिवारात सुरू असलेल्या दारू अड्यांवर पहूर पोलिसांनी छापे टाकून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , गोंदेगाव शिवारात नाल्याला लागूनच असलेल्या दारू भट्टीवर गावठी हातभट्टीची ४ हजार रुपये किंमतीची ४०० लिटर दारू तसेच २ हजार रुपयांचे २० लिटर कच्चे रसायन असे एकूण सहा हजार रुपये किमतीची दारू जागीच नष्ट केली .
तसेच हिवरी शिवारात शेताच्या बांधावर एका ठिकाणी दोन पत्रे ड्रममध्ये साठवलेले चार हजार रुपये किमतीचे चारशे लिटर मद्य तसेच दोन हजार रुपये किमतीचे वीस लिटर कच्चे रसायन असे एकूण सहा हजार रुपये किमतीचे गावठी मद्य नष्ट करण्यात आले असून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत .
पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत , पोलीस कॉन्स्टेबल जितूसिंग परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बाविस्कर, अनिल राठोड होमगार्ड सुरेंद्र पाटील यांच्या पथकाने सदर कारवाई केली असून दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे .
लॉकडाऊन काळात पहूर परिसरात देशी दारूचे ‘फुगे ‘मोठ्या प्रमाणात विकले जात असून सहज मिळणाऱ्या दारुमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे . पहूर परिसरात बिनदिक्कतपणे सुरू असलेली दारू विक्री बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .