GM NEWS UPDATE : दुचाकींची चोरी प्रकरणी पिंपळगांव कमानी येथील तरुणास एलसीबी पथकाने केले जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या स्वाधिन ! आज न्यायालयात केले जाणार हजर ! पहूर परीसरात गुन्हेगारीला सुगीचे दिवस .

0
81

पहूर , दि. १४( प्रतिनिधी) : सुमारे १५ दुचाकींच्या चोरी प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामनेर तालुक्यातील पिंपळगाव अट्टल मोटार सायकल चोरास अटक केली आहे. अटकेतील चोरट्याने जळगाव शहरातील १५ मोटार सायकल चोरीचे गुन्हे कबुल केले असून ते उघड झाले आहेत. पारदर्शी उल्हास पाटील (२०) रा. पिंपळगाव बु. ता. जामनेर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनचे ६, जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे ७, जळगाव शहर पोलिस स्टेशनचा १ व शनीपेठ पोलिस स्टेशनचा १ असे एकुण १५ गुन्हे अटकेतील पारदर्शी नावाच्या चोरट्याने पोलिसी खाक्या बघून पारदर्शकपणे कबुल केले आहेत. पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या सहका-यांना पारदर्शी याच्या मागावर पाठवले होते. त्यानुसार पोलिस तपास पथकातील सर्व कर्मचारी गेल्या चार ते पाच दिवसांपासून पिंपळगाव येथे मुक्कामी थांबले होते. चोरीच्या मोटारसायकलींसह पारदर्शी हा चोरटा पिंपळगाव बुद्रुक येथून पहुरच्या दिशेने येत असतांना शेरी फाट्याजवळ त्याला झडप घालून ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या ताब्यातील मोटार सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने ती मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख,किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव,उमेशगिरी गोसावी,वसंत लिंगायत,महेश महाजन ,अशोक पाटील, मुरलीधर बारी यांनी सहभाग घेतला. अटकेतील पारदर्शी याने कबुल केलेल्या १५ गुन्ह्यांचा तपास मार्गी लागला आहे. यापुर्वी या पथकाने उत्तर महाराष्ट्रातील चैन सँचिंगचे १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दरम्यान , पहूर परिसरात जुगार अड्ड्यांवर चोरीच्या मोटरसायकली सापडतात कशा ? पोलीस प्रशासन जुगार खेळणाऱ्यांना जेलची हवा दाखविणार असूनही जुगार खेळणाऱ्यांना आणि खेळविणाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त आहे , याचाही छडा पोलिसांनी लावण्याची मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे .