GM NEWS ,ग्रेट मराठी न्यूज,प्रेरणादाई वृत्त: ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या 7 व्या वर्धापन दिना निमित्त राबविण्यात आले विविध सेवाभावी उपक्रम . संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान शिबीरांसह वृक्षारोपण आणि अनाथ मुलांना दिला मायेचा आधार .

0
64

जळगांव, दि . १२ ( मिलींद लोखंडे )ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा 7 वा वर्धापन दिन विविध सामाजिक सेवाभावी उपक्रम राबवित शनिवारी संपुर्ण देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्रातही सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, अनाथालयात मिष्टान्न भोजन असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सर्व जिल्ह्यात मिळून तब्बल अडीच हजार रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. याशिवाय ठिकठिकाणी 3 हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही असोसिएशनच्या स्थानिक सदस्यांनी घेतली. राज्यात विविध ठिकाणी असलेल्या अनाथालयांतील सुमारे 4 हजार मुलांना मायेचा गोड घास भरविण्यात आला, अशी माहिती असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप यांच्यासह महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत पाडे ( जळगांव )यांनी दिली.

देशात मोबाईल रिटेलर्स क्षेत्रात लाखो बांधव कार्यरत आहेत. संघटनेचा सातवा वर्धापन दिन साजरा करतानाही समाजपयोगी उपक्रम राबविण्याचे निर्देश  संस्थापक चेअरमन कैलाश लख्यानी राष्ट्रीय  अध्यक्ष अरविंदर खुराणा, वरिष्ठ उपाध्यक्ष विभूती प्रसाद, राष्ट्रीय संयुक्त सचिव नवनीत पाठक यांनी दिले होते. त्या अनुषघांने संघटनेचे राष्ट्रीय सचिव भावेश सोळंकी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. महाराष्ट्रात या उपक्रमांसाठी राज्य अध्यक्ष अजित जगताप, जनरल सेके्रटरी जुजर दोराजीवाला, उपाध्यक्ष महेश चिंचोळी व संजय विरवाणी, विभागीय उपाध्यक्ष विनोद अय्यर, प्रशांत पांडे व संतोष बलदोटा यांनी नियोजन करून मार्गदर्शन केले.

अजित जगताप यांनी सांगितले की, देशभरातील मोबाईल रिटेलर्स ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यात नेहमीच अग्रेसर असतात. असोसिएशन रिटेलर्सच्या न्याय हक्कांसाठी कायम लढा देत आहे. या जोडीलाच कर्तव्यभावनेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचेही काम करीत आहे. भविष्यातही अशा उपक्रमातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न राहील.