अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा . आपत्तीतून सावरण्यासाठी शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी . -मुख्यमंत्री .

0
212

मुंबई, दि. 6 (मिलींद लोखंडे ): – राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभ करणं आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीत ज्या सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, रोजगार हमी मध्ये नुकसानग्रस्त शेताची सफाई कामाचा समावेश करून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी केले त्याचा अहवाल सादर करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या मागण्या आदीबाबत या बैठकीत विविध मुद्दे मांडले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात झालेला यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, पूर परिस्थिती ह्या घटना गेल्या 30 ते 40 वर्षांतील प्रथमच घडल्या आहेत. राज्यात सर्वच भागात पीक परिस्थिती चांगली असताना या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न करावेत. दुष्काळी परिस्थितीत ज्या सोयी-सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पंचनामे तातडीने होणं आवश्यक आहे. विमा कंपन्यांकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी अचूक पंचनामे होणं गरजेच आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पंचनामे वेळेवर आणि अचूक होतील यासाठी क्षेत्रियस्तरावर बैठका घ्याव्यात. तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी मदतीपासून बाधीत राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या.

विमा कंपन्यांनी जास्तीत जास्त भरपाई द्यावी यासाठी राज्यस्तरावर बैठका झाल्या आहेत. केंद्रीय गृह तसेच कृषी मंत्री देखील विमा कंपन्यांची लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजूरांना सावरण्यासाठी रोजगार, अन्नसुरक्षा यासारख्या उपाययोजनांनी दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह वित्त, महसुल, पदुम, कृषी, मदत व पुनर्वसन या विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

0000