शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील अभ्यासासह इतर सुप्त गुणांचेही मुल्यमापन करावे . – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप .

0
57

जळगाव, दि. 17 ( मिलींद लोखंडे ) :- शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासात केंद्रस्थानी असतात. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानार्जनासोबतच त्यांच्यातील क्रीडा, नृत्त, नाटक, वक्तृत्व, वाचन आदि कलागुणांना वाव द्यावा. तसेच त्यांना उद्याचा एक चांगला धावपटू, क्रीकेटर, ॲथलेटीक्स यासारख्या खेळांमधील अव्वल दर्जाचा खेळाडू तसेच उत्कृष्ठ वक्ता, प्रवक्ता, लेखक, नाटककार अशा क्षेत्रातही नैपूण्य प्राप्त करून त्यांच्या शाळेचे आई-वडीलांसह देशाचे नाव उज्वल करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी जिल्हा क्रीडा संकूल येथे जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातर्फे आयोजित चाचा नेहरू बालमहोत्सव 2019 च्या सांगता समारोप प्रसंगी केले.
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कौशिक ठोंबरे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्ह्यातील विविध बालसभागृहातील तसेच शाळांमधील प्रथम, द्वितीय विजेत्या मुला-मुलींचे प्रशिक्षक नितीन विसपुते, डॉ.शैलजा चव्हाण, क्रीडा शिक्षक प्रविण पाटील, इक्बाल मिर्झा, आसिफ मिर्झा, फिरोज शेख, उज्वला पवार, जयश्री पाटील, जाहिद खान, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्रीडा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, ट्रॉफी, ढाल देवून सन्मानित करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळ, वाचन, लेखन, विद्यार्थी स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवून आपल्या शाळेचे नाव उच्च शिखरावर नेण्याचा प्रयत्न करावा. तसेच नियमित व्यायाम करून उत्तम आरोग्य राखावे. खेळांमधून बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होवून कणखरपणा वृदधीगंत होण्यास मदत होते. पोलीस अधिक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्याना विविध कला गुणांमधून मिळालेल्या सन्मानाबद्दल शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील बालकल्याण क्षेत्रातील संस्था अधिक्षक, कर्मचारी व प्रवेशितांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयश्री पाटील यांनी तर आभार सारीका मेतकर यांनी मानले.