GM NEWS ,FLASH: जिल्ह्यात 19 नोव्हेंबर उदया पासून कौमी एकता सप्ताहाचे आयोजन .

0
264

जळगाव, दि. 18 (मिलींद लोोखंडे ) : – केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 19 ते 25 नोव्हेंबर, 2019 हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून राज्यात साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार या सप्ताहात जळगाव जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेत. व या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांना सहभागी करुन घ्यावे. अश्या सुचना अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत.
या सप्ताहात मंगळवार दि. 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस धर्मनिरपेक्षता जातीयवादी विरोध व अहिंसा यांच्यावर भर देणारे सभा, चर्चासत्रे व परिसंवादांचे आयोजन करण्याचे नियेाजन आहे.
बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्यांक कल्याण दिवस अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमावर भर देण्यात यावा, जातीय दंगली उद्भवणाऱ्या शहरातून बंधुभाव निर्मितीसाठी खास मिरवणूका काढण्यात याव्यात.
गुरूवार दि. 21 नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवस :- भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेचा वारसाचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने विशेष वाड;मयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात यावीत.
शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर दुर्बल घटक दिवस :- 20 कलमी कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व जमाती मधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने सभा व मेळावे भरविण्यात यावेत. त्यावेळी इंदिरा आवास योजना व घरासाठी जागांचे वाटप व कर्जाचे वाटप, अतिरिक्त जमिनीचे भूमिहिन मजुरांना वाटप, गरीबांना कायदेविषयक सहाय्य देण्याचे कार्यक्रमही आयोजित करण्यात यावेत.
शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक एकता दिवस:- भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी महिला दिन:- भारतीय समाजातील महिलांचे महत्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देण्यात यावा.
सोमवार दि. 25 नोव्हेंबर रोजी जोपासना दिवस:- पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत अशाप्रकारे कार्यक्रमाची रुपरेखा लक्षात घेवून 1)ध्वजारोहण 2) मिरवणूका व सभा 3) राष्टीय एकतेची शपथ 4) चर्चा, संमेलने 5) चित्रपट दाखविणे व प्रदर्शनांसारख्या कार्यक्रमांतून हा कौमी एकता सप्ताह साजरा करावयाचा आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग नोदवावा. असे आवाहन शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाचे उप सचिव दि. मा. सोनवणे यांनी केले आहे.