बँकांनी कर्जपुरवठा करताना लघु उद्योजकांना प्राधान्य द्यावे . – नरेंद्र पाटील .

0
237

जळगाव, दि. 18 (मिलींद लोखंडे ) : – बेरोजगारीवर मात करण्यासाठी बॅकांना समाजातील होतकरू तरुण, शेतकरी व लघु उद्योजकांना शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करतांना प्राधान्य द्यावेत. अशा सुचना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित महामंडळाच्या योजनांच्या आढावा घेण्यासाठी अध्यक्ष श्री. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक संचालिका अनिसा तडवी जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अरूण प्रकाश, राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे प्रतिनिधी, लाभार्थी आदि उपस्थित होते.
अध्यक्ष नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, यापुढे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना जिल्हा किंवा मुंबई येथे येण्याची आवश्यकता भासत नाही. लाभार्थ्यांनी आपले कर्ज प्रकरण सादर करताना त्या प्रकरणांना लागणारी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केली आहे किंवा कसे याची खात्री करावी. लाक्षार्थ्यांसोबतच बँकानी ही प्रकरण सादर करून घेताना आवश्यक ती कागदपत्रे जोडले असल्याची खात्री करून घेवूनच प्रकरण सादर करून घ्यावे. जेणेकरुन त्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असल्यास लाभार्थ्यांना त्याचवेळी सर्व व्यवस्थित समजावून सांगता येईल व त्यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊनच प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविता येईल. जेणेकरुन कर्ज मागणी प्रस्ताव मंजूरीस बँकानाही कोणताही अडथळा येणार नाही.
शासनाच्या महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी बँकांनी कर्ज मंजूरी पध्दत अधिक सुलभ करावी. लाभार्थ्यांनी सुध्दा कर्ज वेळेवर भरून बँकांना, शासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. पाटील यांनी केले.
जिल्हा अग्रणी बँकेचे ‍व्यवस्थापक अरूण प्रकाश यांनी आढावा बैठकीस उपस्थित सर्व बँकांच्या प्रतिनिधींना मंडळांच्या कर्ज प्रकरणी अधिक लवचिकता बाळगावी आणि कोणताही लाभार्थी बँकांविषयी नाराजी व्यक्त करणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन विविध बँकांच्या प्रतिनिधींना केले.