जामनेर,दि. ८ ( मिलींद लोखंडे ) : – पोलीसांवर हल्ला करुन वाहनावर दगडफेक करुन फरार झालेल्या चौघांच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या. भिवंडी व मालेगांव येथे दबा धरुन बसलेले हे चौघे दोनदा हातुन निसटल्यानंतर अखेर तिसर्यांदा त्यांचेसाठी नाकेबंदी लावण्यात आली.
अल्पवयीन बालिकेच्या विनयभंग प्रकरणातील संशयितास ताब्यात देण्याची मागणी करणाऱ्या जमावातील काहींनी पोलिसांच्या वाहनावर व पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत चार संशयितांना पोलिसांनी शिताफीने रविवारी मध्यरात्री अटक केली. गेल्या महिन्यापासून हे चौघे भिवंडी व मालेगाव येथे लपून बसले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शहरात चार ठिकाणी नाकेबंदी केली होती.
दोन वेळेस ते जामनेरला येऊन गेले मात्र पोलिसांच्या हातून निसटून गेल्याने पोलिसांनी अखेर त्यांना तिसऱ्या प्रयन्तात जाळ्यात अडकविलेच. ३१ डिसेंबर २०२१ ला घरकुल परिसरात एका प्रौढांच्या बालिकेचा विनयभंगाचा प्रयन्त केला होता. जामनेर पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेली असता जमावाने पोलिसांवर दगडफेक करून वाहनांची काच फोडली होती. दगडफेकीत चार पोलीस जखमी झाले होते.
यांनी रचला सापळा
पोलीसांवर व वाहनावर दगडफेक करणार्यांच्या अटकेसाठी निरीक्षक किरण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड, विनोद पाटील, योगेश महाजन, मुकेश अमोदकर, निलेश घुगे, तुशार पाटील, सोनुसींग डोभाळ,संदीप पाटील व तृप्ती नन्नवरे यांनी सापळा रचला होता.
————————————————
सावज असे जाळ्यात अडकले
फरार झालेले कैफ शेख रफिक, शेख अरबाज शेख सलीम, शेख वसीम शेख मुनाफ व सादिक शेख सांडू शेख यांचे मागावर पोलीस होते. भिवंडी व मालेगाव येथे ते लपून बसले होते. मध्यंतरी ते जामनेरला आले असता त्यांचेवर नजर ठेवण्यात आली, मात्र ते गवसले नाही. पुन्हा ते जामनेरला आल्याची माहिती मिळाली मात्र पुन्हा ते फरार होण्यात यशस्वी ठरेल. अखेर शनिवारी ते शहरात आल्याची माहिती मिळाली. त्यांच्या अटकेसाठी आम्ही पोलिसांचे ३ पथक विविध भागात तैनात केले. चार ठिकाणी नाकेबंदी केली. अखेर मध्यरात्री सावज आमच्या जाळ्यात अडकलेच अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिली.
————————————————-