ग्रेट मराठी न्युज, क्रीडा वृत्त : श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे ४ दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न !

0
972

जामनेर,दि.१५ ( मिलींद लोखंडे ) : –
जामनेर पासून अवघ्या २ मैल अंतरावर स्थित श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पळासखेडे बु. येथे ०९ मार्च ते १२ मार्च २०२२ दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये डी. फार्मसी आणि बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यां नी (मुलांनी आणि मुलींनी) उत्स्फूर्त सहभाव नोंदवला. “रेझोनान्स २K२२” या वार्षिक कार्यक्रमांतर्गत क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. यात घरातील खेळ प्रकारांमध्ये कॅरम, बुद्धिबळ आणि टेबल टेनिसचे तर मैदानी खेळप्रकारातील क्रिकेट आणि रस्सी खेच या खेळांचे आयोजन केलेले होते. या दोन्ही खेळ प्रकारांचे उदघाटन संस्थेचे सचिव श्री. मनोजकुमारजी कावडीया यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर आर. भुरट, डी. फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा. सुनील बावस्कर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल पाटील समवेत क्रीडा समितीमधील सर्व सदस्य उपस्थित होते.
प्रत्येक क्रिकेट सामन्यात सुरुवातीस राष्ट्रगीत गायले जायचे आणि नियुक्त प्रमुख पाहुण्यांना नाणेफेक करण्यासाठी आणि खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी बोलावले जायचे आणि त्यानंतर क्रिकेट सामना सुरू केला जायचा. प्रत्येक क्रिकेट सामन्यानंतर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला (मुलांसाठी) “मॅन ऑफ द मॅच” आणि मुलींसाठी ” उमन ऑफ द मॅच “चे मेडल तसेच प्रमाणपत्र दिले जायचे. सर्व विद्यार्थ्यांनी (सहभागी खेळाडूंनी व प्रेक्षकांनी) या सर्व खेळांचा मनमुराद आनंद लुटला.
मुलांमधून बुद्धिबळमध्ये प्रतीक पाटील (चतुर्थ वर्ष बी. फार्मसी), कॅरममध्ये आसीम शेख (प्रथम वर्ष डी. फार्मसी),टेबल टेनिसमध्ये हितेश जैन (चतुर्थ वर्ष बी. फार्मसी), रस्सी खेचमध्ये तृतीय वर्ष बी. फार्मसीचा संघ, तर क्रिकेटमध्ये प्रथम वर्ष बी. फार्मसी वर्ग ब चा संघ हे विजेते म्हणून घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे मुलींमधून बुद्धिबळमध्ये श्वेता शेवतकर (तृतीय वर्ष बी. फार्मसी), कॅरममध्ये तेजस्विनी बडगुजर (चतुर्थ वर्ष बी. फार्मसी),टेबल टेनिसमध्ये ऐश्वर्या साकला (चतुर्थ वर्ष बी. फार्मसी), रस्सी खेचमध्ये प्रथम वर्ष बी. फार्मसी वर्ग अ चा संघ, तर क्रिकेटमध्ये द्वितीय वर्ष बी. फार्मसी चा संघ हे विजेते म्हणून घोषित करण्यात आले.
या ४ दिवसीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रा. भूषण गायकवाड, प्रा संदीप चौधरी, प्रा. कांचन महाजन, विद्यार्थ्यांमधील नियुक्त क्रीडा सचिव, सागर चौधरी तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. संस्थेचे सचिव श्री. मनोजकुमारजी कावडीया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर आर. भुरट आणि डी. फार्मसीचे विभाग प्रमुख प्रा. सुनील बावस्कर यांचे या ” ४ दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन ” करण्यासाठी विशेष मार्गदर्शन लाभले.