GM NEWS , FLASH : शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे . – प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत • 360 रुपयात मिळणार 24 हजार रुपयांचे पीक विमा संरक्षण • जोखीम टाळण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन .

0
293

जळगाव, दि. 30 (मिलींद लोखंडे ) :- रब्बी हंगाम 2019-20 मध्ये अधिसुचित पीकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर, 2019 पर्यंत अंतिम मुदत आहे. रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे आणि पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. हा शेतकरी हिताचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रब्बी हंगाम 2019-2020 मध्ये जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून (Area Approach) राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये- ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एैच्छिक आहे. नुकसान भरपाई कृषि आयुक्तालयामार्फत पिक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेतलेल्या पिक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
जोखमीच्या बाबी-अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होवू न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहिल. दुष्काळ, पावसातील खंड, पुर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कासळणे, चक्रीवादळ आणि गारपीट या टाळता न येण्यायोग्य जोखमींमुळे पिके पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण देय राहिल.
पिकनिहाय विमा हप्ता दर व विमा सरक्षित रक्कम- सर्व अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी संरक्षित रकमेच्या 1.5 टक्के दराने आणि कांदा पिकासाठी संरक्षित रकमेच्या 5 टक्के दराने विमा हप्ता आकारला जाईल. पिके, जोखीमस्तर (टक्केवारीत), विमा संरक्षित रक्कम (रुपयात), शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम अनुक्रमे अशाप्रकारे आहेत. प्रत्येक पिकाचा जोखीमस्तर 70 टक्के इतका राहिल. गहू, बाजरी- विमा संरक्षित रक्कम रुपये 33 हजार, शेतकऱ्यांने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 450/-, ज्वारी,बाजरी- विमा संरक्षित रक्कम 24 हजार रुपये, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, ज्वारी जिरायत- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 360/-, हरभरा- विमा संरक्षित रक्कम रुपये 24 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रक्कम रुपये 360/-, भुईमुग- विमा संरक्षित रक्कम रुपये 35 हजार, शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम रुपये 525/-, कांदा- विमा संरक्षित रक्कम रुपये 52 हजार, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम रुपये 2600/- अशाप्रकारे आकारणी करण्यात येईल.
रब्बी हंगाम 2019-2020 अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंमध्ये अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी जवळच्या बँकेत, आपले सरकार सेवा केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधून सहभाग नोदवावा. अथवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वत: सहभाग नोदविण्याची सुविधा आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा हप्ता संबंधित बँकेद्वारे भरला जाऊन सहभाग नोदविला जातो. विमा हप्ता भरण्यापूर्वी आपले शिवार ज्या महसूल मंडळात आहे, त्या महसूल मंडळाचा योजनेंतर्गत समावेश असल्याबाबतची खात्री केल्यावरच विमा हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी नजिकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, राष्ट्रीयकृत बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.