ग्रेट मराठी न्यूज,GM NEWS,प्रेरणादाई वृत्त : जामनेर तालुक्यातील महान तपस्वी चित्रकार स्वर्गीय एल .जी .महाजन सर आणी पिसुर्वो यांच्या अप्रतिम चित्रांचे जळगाव नगरीत उद्या रविवारी प्रदर्शन . क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन . जामनेर तालुक्यातील सोनारी येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार जितेंद्र पुंडलिक सुरळकर उर्फ पिसोर्वो यांच्या कल्पकतेला ‘पु . ना . गाडगीळ अँड सन्स ‘ व ‘परिवर्तन ‘ चे बळ तीन पीढ्यांना जोडणाऱ्या अविस्मरणीय चित्र प्रदर्शनीचा खान्देशवासीयांनी लाभ घेण्याचे आवाहन .

0
401

जामनेर , दि १५ ( मिलिंद लोखंडे )
जामनेर तालुक्याचे भुमीपुत्र तपस्वी निसर्गचित्रकार स्व. लक्ष्मण गणपत महाजन ( एल . जी . महाजन सर ) आणी मुळ सोनारी येथील चित्रकार जितेंद्र पुंडलीक सुरळकर उर्फ पिसुर्वो या द्वयींच्या अप्रतिम चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या रविवार दि . १६ ऑक्टोबर २०२२ रोजी राज्याचे क्रीडा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री ना . गिरीश महाजन यांच्या हस्ते जळगाव नगरीत आयोजित करण्यात आले आहे. तीन पीढ्यांना जोडणारा या दोघांचा कलाप्रवास ‘ LAXAMAN TO LAXAMAN’ या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातुन उद्या सर्वांना अनुभवता येणार आहे.
स्व.कलाशिक्षक लक्ष्मण गणपत महाजन हे पंचक्रोशीत एल.जी. महाजन म्हणून परिचित होते.त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल जामनेर जि. जळगाव येथे सलग ४१ वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून कार्य केले. त्यांच्या जाण्याला २२ वर्षे लोटलीत. त्यांनी केलेली निवडक निसर्ग चित्रे ” *LAXMAN TO LAXMAN* ” या नावाने पु.ना.गाडगीळ अँड सन्स जळगाव दि.१६ ऑक्टोबर२०२२ रोजी प्रदर्शित होत आहेत. या प्रदर्शनाची संकल्पना चित्रकार पिसुर्वो सुरळकर यांची आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ना.गिरीष महाजन वैद्यकीय मंत्री,म.राज्य मुंबई यांच्या शुभहस्ते होत आहे. या निमित्ताने एल.जी. महाजन यांचा कलाप्रवास उलगडतांना सर्व कला रसिकांना आनंद होणार आहे .
भारतीय कलेबद्दल आस्था असणारे कॅ.ग्लॅंडस्टन सालोमन हे सन १९१९ ला सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या जगद्विख्यात कला संस्थेचे प्राचार्य झाले. त्यांचा १७ वर्षाचा कार्यकाळ अनेक अंगाने वैभव संपन्न समजला जातो.राजा रविवर्माच्या ॲकॅडमीक शैलीच्या तैलचित्रांचे तत्कालीन पिढीला अप्रूप होते‌. आणि दुसरीकडे ल‌.म.तासकर मास्तर,रावबहादुर धुरंदर, माधवराव परांडेकर,एस एल हळदणकर इ. दिग्गज चित्रकारांची जलरंगातील निष्णात चित्रकला खुणावत होती. तैलरंग हाताळण्याची उत्सुकता आणि पारंपारिक जलरंग माध्यमावर प्रभुत्व मिळवण्याची धडपड यांची सरमिसळ करण्याचा तो काळ. या महत्त्वाच्या कालखंडात एल.जी.महाजन यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधून सन १९३१ते १९३६ च्या दरम्यान डी.टी.सी.(ड्रॉइंग टीचर्स सर्टिफिकेट), ए.एम.(आर्ट मास्टर),ॲडव्हान्स एक्झामिनेशन ऑफ ड्रॉइंग अँड पेंटिंग हे अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले.प्रसिद्ध चित्रकार व माजी कला संचालक म.राज्य माधवराव सातवळेकर व रेषेचे बादशाह चित्रकार शावाक्ष चावडा हे त्यांचे सहाध्यायी होते.ग्लॅडस्टन सालोमन,मारी हिंडरसन यांची व्यक्तिचित्रे महाजन यांना आवडायची. या प्रभावात त्यांनी काही पोट्रेट्स केलीत पण त्यांना फार प्रतिसाद लाभला नाही. ए.एम.च्या वर्गात एल.जी.ना एस.बी.कुलकर्णी(?) सरांचे मार्गदर्शन लाभले तर ॲडव्हांसच्या वर्गात त्यांना तळवडेकरांनी शरीरशास्त्राचा अभ्यास,तैल रंग माध्यमाचे तंत्र समजावून सांगितले.या गुरुंप्रती शेवटपर्यंत त्यांना आदर होता. एल.जी.महाजन यांना मुंबई पुण्यासारख्या शहरात स्थिरावण्याची संधी असताना त्यांनी जामनेर या तालुक्याच्या छोट्या गावात चित्रकला शिक्षक होणे पसंत केले. गावाच्या परिसरात असलेल्या पहाडीबुवा,सोनबर्डी,राशीमुशी या टेकड्या व तेथील निसर्ग,गावाबाहेरुन बारमाही वाहणाऱ्या कांग नदीचा वळणदार घाट, नदीच्या अल्याड पल्याडची बायका माणसांची कामाची धावपळ,गावातील नगारखाना चौक,दर्गा,मंदिरे जागिरदारवाड्याची जुनी इमारत त्यांच्या निसर्गचित्रांचा विषय होऊ लागला.९४ वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी एक हजारांवर निसर्ग चित्र रंगविलीत. त्यांच्या काही निसर्गचित्रांना बक्षीसेही मिळालीत; त्यात शाहू महाराज आर्ट सोसायटी (कोल्हापूर),महाराष्ट्र इंडस्ट्रियल प्रदर्शन(पुणे),पहिले मराठी साहित्य संमेलन(अमळनेर) ही महत्त्वाची आहेत.स्पर्धांमधून निसर्ग चित्र पाठवावी असा त्यांचा पिंड नव्हता. प्रसिद्धीच्या कोसो दूर राहून निरलस पणे कलाध्यापन करणे,आत्ममग्न होऊन आजूबाजूच्या निसर्गाच्या बदलत्या मूड्स ना चित्रबद्ध करणे, त्यातून आनंद घेणे एवढेच त्यांना जमे.ललित कला अकादमी,नवी दिल्लीच्या पहिल्या डिरेक्टरीत त्यांचा परिचय व निसर्ग चित्र छापलेले होते(१९८१), ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्टस् सोसायटी(आयफेक्स) नवी दिल्ली या संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त एल.जी,सरांना वेटरन आर्टिस्ट म्हणून रौप्यपट्टीका देऊन गौरवलेले होते ,ही समाधानची बाब आहे .
चोपडा येथील ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी एल .जी .सरांबद्दल बोलताना सांगितले की , सन १९८७ मध्ये दिवाळीच्या दिवसात जामनेरच्या सुतार गल्लीतील त्यांच्या घरी मी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी उत्साहाने आपल्या हातांनी त्यांची शेकडयांवर निसर्ग चित्रे मला दाखविली होती व त्यांच्याकडून त्या त्या स्थळांची वर्णने ऐकता ऐकता दोन-तीन तास सहज निघून गेल्याचे आज आठवते.गौरवर्णी देखणेपण लाभलेल्या एल.जी. सरांची भाषा सौम्य मृदू, बोलण्याची हळूवार पद्धत मला भारी आवडली होती.मी प्रश्न विचारण्यापूर्वीच ते,”माझ्या आईचे माहेर पिंपळगाव हरेश्वरचे…आजोळी नेहमीच येणे जाणे व्हायचे,जामनेर पाचोरा नॅरो गेज रेल्वेने प्रवास व्हायचा, धुराच्या इंजिनच्या या रेल्वेचा वेग सावकाश असायचा. दोन्ही बाजूंनी निळ्या डोंगराच्या दूरवरच्या रांगा दिसायच्या, त्यातील लहान मोठ्या टेकड्या सततच्या बघण्यातून मला निसर्गाची ओढ निर्माण झाली आणि वयाच्या १०व्या वर्षीच अजिंठा वेरूळ लेण्यांना भेट दिल्यामुळे तिथला आगळा निसर्ग पाहिल्यानंतर तर मी हरखून गेलो होतो. सुरुवातीला झाडांची चित्रे केलीत.गोविंद महाराजांच्या मंदिराला रंगवणाऱ्या टेणी नावाच्या पेंटरने पहिल्यांदा माझ्या चित्राची वाहवा केली;त्यामुळे उत्साह दुणावला.मॅट्रिक झाल्यावर प्रांत कार्यालयात नोकरी पण कलेची आवड स्वस्थ बसू देईना,शासकीय रेखाकला परीक्षा उत्तीर्ण असल्याने अधिकृत चित्रकला शिक्षकाचे शिक्षण नसताना सुद्धा न्यू इंग्लिश स्कूलला नोकरी मिळाली.तिथल्या बेंडाळे सरांनी कलेच्या उच्च शिक्षणासाठी मुंबईला जाण्याचा आग्रह केला आणि मी चित्रकला शिक्षक झालो.असे बरेच मला ते सांगत राहिले आणि मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहीलो.
एल.जी. महाजन यांच्या निसर्गचित्रांची धाटणी काहीशी वेगळी होती.त्यांनी ऑईल पेंट, ऑईल पेस्टल्स् या माध्यमातून काही निसर्ग चित्रे केलीत पण ते अधिक रमले पारदर्शक अशा जलरंग माध्यमात.त्यांना मुद्दामहून कुलू मनाली सारख्या निसर्गरम्य स्थळांवर निसर्गचित्रणासाठी जावे असे कधी वाटले नाही.त्यांचा निसर्ग आपल्या मातीतला; अनुभवलेला,मनावर कोरला गेलेला होता.जसे कांग नदीचा वळसेदार घाट, तेथील भांडीधुणी करणाऱ्या व डोक्यावर पाणी वाहणाऱ्या बायका, शेताकडे निघालेले कष्टकरी, गांवकरी, हिरव्या छटांनी नटलेली नजिकची शेतीवाडी, नगारखाना चौक;तिथला ऊन सावलीचा खेळ आणि धुक्यात हरवलेला गावगाडा एल.जी. सरांनी सातत्याने वारंवार चित्रबद्ध केला.नगारखान्याची तर अनेक चित्रे त्यांनी केलेली आहेत. ‌ ‌ त्यांच्या निसर्गचित्रणात रंगांचा उत्सव नाही,भडकता नाही मात्र आपलेपणा आहे,अनुभवलेला जिवंतपणा आहे तसेच सहज सोप्या जवळजवळच्या रंगछटातून मारलेले फटकारे आहेत.रंगाचा ताजेपणा हा त्यांच्या निसर्गचित्रांचा स्थायीभाव आहे.प्रत्येक निसर्गचित्रणाची मांडणी अगदी साधीच आहे पण लय ही विशेषाने आलेली दिसते.कुठल्याही समकालीन चित्रकारांच्या चित्रांचा प्रभाव त्यांनी टाळलेला दिसतो.त्यांच्या रंगलेपनातील हळुवारता,नाजूकता आणि काव्यात्मकता रसिक मनाला जिवंत भावबोलका अनुभव देतांना दिसते. रूट ऑफ लव,नगारखान्यात पोहोचलेला महापूर ही निसर्गचित्रे त्यांच्यातील हळवी संवेदनशीलता प्रकट करणारी आहेत. निसर्गाच्या निरव शांततेचा अनुभव देणारी निसर्ग चित्रे महाजन सरांच्या शांत, अबोल व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवून देण्यात यशस्वी ठरते. ‌ ‌ . ‌ पाळण्यातील लक्ष्मण म्हणजे युवाचित्रकार पिसुर्वो सुरळकर व जुन्या पिढीतील लक्ष्मण म्हणजेच एल.जी.,महाजन;दोघेही एकाच जामनेर तालुक्यातील मातीतले….LAXMAN TO LAXMAN हे प्रदर्शन तीन पिढ्यांना जोडणारे असे आहे.पिसुर्वोंकडे काळाच्या गतीशी स्पर्धा करणारे झपाटलेपण आणि निसर्गांतील नीरव शांततेचा अनुभव देणारे एल.जी.महाजन;
दोहोंच्या कलाअनुभवांचा एकत्रित प्रयोग, रसिकांना नक्कीच पर्वणी ठरावी.

जामनेर तालुक्यातील सोनारी सारख्या ग्रामीण भागातील चित्रकार
पिसुर्वो ( जितेंद्र पुंडलिक सुरळकर )यांच्या विषयी ‘ चिन्ह ‘ चे संपादक सतीश नाईक यांनी ग्रेट मराठी न्यूजशी बोलताना सांगितले की , २००० सालापर्यंत जवळजवळ रोजच सायंकाळी जहांगीरला माझी एक फेरी असे. ऑफिस सुटलं का चालत चालत जहांगीर, आर्टिस्ट सेंटर आणि मग पुन्हा चालत चालत थेट व्हीटी स्टेशन, असा माझा रोजचा दिनक्रम असे. प्रख्यात चित्रकार के. एम. शेणॉय यांनी आर्ट प्लाझाची सुरु केलेली चळवळ मी अगदी जवळून पाहिली. त्यातले बहुसंख्य आर्टिस्ट माझ्या परिचयाचे होते. नोकरी सोडल्यानंतर मात्र जहांगीरला जाणं कमीकमी होत गेलं. त्याच काळात कधीतरी जितेंद्र सुरळकर उर्फ पिसुर्वो आर्ट प्लाझाच्या चळवळीत सहभागी झाला असावा. त्यामुळे त्याचा माझा फारसा परिचय असा झालाच नाही.

नंतर शनिवारी जहांगीरला जाऊ लागलो. आणि या काळात एक काळासा वर्ण असलेला तरुण आर्ट प्लाझामध्ये दिसू लागला. पण तोपर्यंत मी चित्रकलाविषयक सर्वच चळवळीतून दूर झालो होतो. त्यामुळे त्याच्याशी परिचय असा कधी झालाच नाही. के. एम. शेणॉय गेल्यानंतर तर आर्ट प्लाझाशी असलेला उरला सुरला संपर्क देखील तुटला. के. एम शेणॉय यांच्या निधनापूर्वी मात्र त्यांच्यावरचा एक प्रदीर्घ लेख ‘चिन्ह’मध्ये प्रसिद्ध करण्याची संधी मला लाभली. त्याच काळात आर्ट प्लाझा चळवळीविषयी तसेच के. एम. शेणॉय यांच्यासारख्या मनस्वी कलावंताला त्यातून कसे बाहेर पडावे लागले ? वगैरे ऐकून तर जहांगीरच्या पायऱ्या उतरून मी आर्ट प्लाझाकडून जाणं देखील कटाक्षानं टाळू लागलो होतो.

याच काळात एके दिवशी जहांगीरच्या पायऱ्यांवरच पिसुर्वोचा किस्सा कुणीतरी मला सांगितला. की उदाहरणार्थ हा जितेंद्र सुरळकर जो आहे त्याची सुमारे ५००० चित्रं २००५ सालच्या पावसात भिजून गेली वगैरे. ऐकून वाईट वाटलं ! पण का कुणास ठाऊक, त्याच्याशी संवाद साधणं हे मला काही जमलंच नाही. त्याच्याविषयी काहीना काही बातम्या कुणाना कुणाकडूनच मला कळत असत. पण सुमारे सहा महिन्यापूर्वी एके दिवशी मला त्याचा फोन आला. ‘सर, मला काही करून गायतोंडे यांच्या पुस्तकाची डिलक्स एडिशन हवी आहे !’, असं सांगणारा. पण म्हणाला, माझ्याकडे आता पैसे नाहीत. लॉकडाऊनमुळे सगळीच गडबड झाली आहे. माझी पेंटिंग गेली की मी तुम्हाला पैसे देईन. मी म्हटलं काहीच हरकत नाही, सावकाश दे. मी पाठवतो तुला पुस्तक. आणि मी लागलीच ते कुरियरनं पाठवलं देखील. पण त्याला काही ते मिळालं नाही, माझ्याकडे परत आलं. पुन्हा पोस्टानं पाठवावं लागलं तेव्हा कुठं त्याला मिळालं.
आणि मग नंतरचे काही दिवस दररोज वेळी अवेळी त्याचे फोन येऊ लागले, व्हॉट्सअप मेसेजेस येऊ लागले. ‘गायतोंडे’ ग्रंथ वाचून त्यांच्या व्यक्तिमत्वानं तो प्रचंड प्रभावित झाला होता. आणि म्हणून तो मला फोन करत होता, मेसेजेस पाठवत होता. त्याच्या दोन छोट्या मुलांनी देखील तो ग्रंथ हाताळला होता. इतकंच नाही तर ते वाचत देखील होते हे तो अत्यंत कौतुकानं मला सांगत होता.

काही महिन्यानंतर असाच एकदा पुन्हा त्याचा फोन आला. म्हणाला, सर खूप पेंटिंग विकली गेली. ‘गायतोंडे’ ग्रंथाचे पैसे द्यायचे आहेत. कुणातरी मित्र किंवा कलेक्टरला ‘गायतोंडे’ ग्रंथ भेट द्यायचा आहे. मी तुमच्याकडे येऊ का न्यायला ? मला विचारत होता. लॉकडाऊनचा तो काळ होता. तो कसा प्रवास करणार हा मला प्रश्न पडला होता, पण पठ्ठ्या आला ! कल्याणहून थेट रिक्षा घेऊन ठाण्यापर्यंत आला. लवकर जायचंय असं सांगून जवळजवळ तास दोनतास गप्पा मारत बसला होता. बाहेर रिक्षा तशीच वेटिंगवर. तेव्हा जितेंद्र सुरळकर उर्फ पिसुर्वो हे काय प्रकरण आहे हे मला उमगलं. भडाभडा तो बोलत होता. आयुष्यातले सगळे कडू गोड प्रसंग त्यानं मला तेव्हा ऐकवले. तो निघायला उठला तेव्हाच मी त्याला ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंही ते लगेचच स्वीकारलं देखील.

अजिंठ्यापासून ३४ किलोमीटरवर असलेल्या सोनारी गावचा तो खिरोद्याच्या सप्तपुट कला महाविद्यालयातून त्यानं त्याचं कलेचं शिक्षण पूर्ण केलं. चित्रकार गुलजार गवळी यांचा तो लाडका विद्यार्थी. शिक्षण पूर्ण होताच तो मान्सून शोच्या निमित्तानं मुंबईला पहिल्यांदा आला. मुंबईत तो आला त्यादिवशी बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली होती आणि मुंबईतल्या गाड्या बंद पडल्या होत्या. बंद पडलेल्या एका गाडीत हा अडकला होता. मुंबईत पहिल्यांदा आलो आणि हा अनुभव ! तो अगदी भेदरून गेला होता. पण तो तसाच बसून राहिला. खूप वेळ गेल्यावर गाड्या सुरु झाल्या पण घाटकोपरजवळ गाडी आली आणि गाडीवर प्रचंड दगडफेक झाली. डब्यावर पडलेल्या दगडांचे आवाज आजही जसेच्यातसे आठवतात, तो सांगत होता.
मान्सून शोमध्ये त्याची सर्वच चित्रं पहिल्या दोन-तीन दिवसातच विकली गेली. मुंबई त्याला आवडली, पण घरातून मुंबईला यायला विरोध झाला. अखेरीस एका एनिमेशन कंपनीमध्ये जळगावातली दोनशे तीनशे मुलं आली त्यातला एक बनून तो मुंबईला आला. सात महिने काम केलं, पण त्यात काही तो रमला नाही. एका मित्रानं त्याची आर्ट प्लाझाचे जनक के. एम. शेणॉय यांच्याशी गाठ घालून दिली. त्याला शेणॉय देखील आवडले आणि आर्ट प्लाझादेखील. विशेषतः जहांगीरसमोरची झाडं वगैरे बघून तो भलताच खुश झाला ! गावच आठवला त्याला. २००१ साली त्यानं आर्ट प्लाझामध्ये पहिलं स्केच केलं, सात रुपये मिळाले त्याचे त्याला. चार वर्ष त्यानं आर्ट प्लाझामध्ये काम केलं. भरपूर पोर्ट्रेट्स केली, भरपूर स्केचेस केली, पण तो तिथंच थांबला नाही. तो पेंटिंग देखील करत राहिला.

२००५ साली शेणॉय यांनी आर्ट प्लाझा सोडल्यावर तो देखील त्यांच्यासोबत तिथून बाहेर पडला आणि काळा घोडामध्ये चित्र लावू लागला. काळा घोडा फेस्टिव्हल संपल्यानंतर त्यानं त्या जागेवर नव्यानं संसार मांडला. स्केचेसच नाही तर पेंटिंग देखील तो तिथंच करू लागला. ‘आर्ट प्लाझामुळेच पेन्सिलीच्या ताकदीवर मी मुंबईमध्ये उभा राहिलो’, असं तो अभिमानानं सांगतो. ‘काळा घोडामध्ये एके दिवशी मी ९० स्केचेस काढली. मिळालेले पैसे मोजायला देखील वेळ नसायचा. मी ते शर्टाच्या आत बनियनमध्ये टाकून द्यायचो. किती पैसे कमावले त्याची मोजदादच केली नाही.’

तो कल्याणला राहत होता, मावशीकडे, वरपगावात. २००५ सालीच २६ जुलैला जो महाप्रलय झाला त्यात तो सापडला. १९ फूट पाणी चढलं होतं. पाणी कुठून येतंय ? कसं येतंय ? काहीही कळत नव्हतं. अचानक सहा-सहा फूट उंच पाणी चढायचं ! मी ज्या चाळीत राहत होतो ती लोडबेरिंग ची चाळ होती. राहतो का वाचतो ? असाच प्रश्न आम्हाला पडला होता. मी चांगली पोर्ट्रेट्स करतो पण त्यावेळचे कुणाचेच चेहरे आता आठवत नाही. त्या पुराच्या पाण्यात माझी कागदावर काढलेली ५००० चित्रं आणि ३५-४० कॅनव्हास नष्ट झाले. पाच वर्षात चित्रकलेचं असं जे जे काही कमावलं होतं ते सारं पावसानं नष्ट केलं होतं. तो अतिशय शांतपणे सगळं सांगत होता.

नंतर मी जी चित्रं रंगवली ती सारी पुरावरचीच होती. ती सारीच्या सारी विकली गेली. काळा घोडा मधूनच मी ती विकली. कला साहित्याची विक्री करणाऱ्या सदाशिवनं मला खूप मदत केली. त्याचंही पुरानं नुकसान केलं होतं, पण त्यानं मला बोलावलं. म्हणाला, तू खूप चांगलं काम करतोस, तुला कुठलं हवं ते आर्ट मटेरियल घेऊन जा ! चित्रकार दत्ता बनसोडेंनी देखील मला मदत केली. काळा घोडाला तर एक संग्राहक मला असा भेटला की माझी ही सारी पुराची कहाणी ऐकून त्यानं एकदम माझे जवळजवळ ५० एक कॅनव्हास विकत घेतले. त्यातून मिळालेल्या पैशानं मी स्वतःचं घर आणि स्टुडियो घेतला. अशी माणसं पाठीशी उभी राहिल्यामुळेच मी पुन्हा उभा राहू शकलो, हे तो अगदी मनापासून सांगत होता.

त्यानंतर एकेका संधीचं दार मला आपोआपच उघडत गेलं. फक्त दोन प्रदर्शनं मी माझ्या पैशानं केली. पण बाकी सारी १२-१३ प्रदर्शनं हे स्पॉन्सर शोज होते आणि ते केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही झाले. काळा घोड्यावर काम केलेल्या माझ्यासारख्या छोट्या कलावंताला मोठ्या मोठ्या संधी प्राप्त झाल्या त्या केवळ निष्ठेनं केलेल्या कामामुळेच ! ज्या हुसेन यांना मी खूप मानतो, त्यांच्याच दोशी – हुसेन गुंफेमध्ये काम करण्याचा, प्रदर्शन करण्याचा अनुभव तर केवळ अद्भुतच होता. अहमदाबादचे कला संग्राहक अनिल रेलिया यांच्यामुळे तो मला मिळाला. माझं भाग्य थोर त्यामुळे अशा लोकांच्या सहवासात मी येत गेलो. आज जे काही थोडंबहुत मी मिळवलं आहे, शून्यातून दोन वेळा जो काही उभा राहिलो आहे त्याचं श्रेय पिसुर्वो या साऱ्यांनाच देतो. पिसुर्वोविषयी अजून खूप लिहिण्यासारखं आहे, पण त्याच्या तोंडून ते ऐकण्यात अधिक मझा आहे. येत्या शनिवारी म्हणजे, १९ मार्चला सायंकाळी ०५.३० वाजता मी त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. ऐकायला, पाहायला विसरू नका !