ग्रेट मराठी न्यूज,GM NEWS, गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील पहूर येथे इलेक्ट्रिकल दुकानात धाडसी चोरी . लाखोंच्या ऐवजावर मारला अज्ञात चोरट्यांनी डल्ला दुकानाचे शटर तोडून आतमध्ये केला प्रवेश . पुरावे नष्ट करण्यासाठी चक्क ‘सीसीटीव्ही ‘चे ‘डीव्हीआर ‘ लांबवले . श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांकडून तपासाला गती .

0
869

पहूर , ता .जामनेर , दि . २० ( शंकर भामेरे) येथे जळगाव – पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नागवेली इलेक्ट्रिकल अॅन्ड सेल्स या दुकानात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी ( ता . १९ ) मध्यरात्रीच्या सुमारास घडली . 

       याबाबत अधिक माहिती अशी की , राजू बाबुराव बारी यांचे जळगाव – पुणे राष्ट्रीय महामार्गालगत नागवेली इलेक्ट्रिकल नावाचे दुकान आहे .नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद करून ते घरी गेले . मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पुढील शटर वाकवून व मागील चॅनेल गेटचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला . दुकानात असलेले २ लाख २५ हजार किमतीचे २५० किलो वजनाचे पितळी बुशींग , १लाख ४४ हजार रुपये किमतीचे कॉपर वायर बंडल , ४८ हजार रुपये तिचे तांब्याचे वायर बंडल , ८४ हजार ५०० रु . किमतीचे तांब्याचे भंगार तसेच २० हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे डीव्हीआर उपकरण

अशाप्रकारे लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेत पोबारा केला .

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांच्यासह भरत लिंगायत ,रवींद्र देशमुख ,ईश्वर देशमुख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला . तपास कामी जळगाव येथून श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते .याप्रकरणी दुकानाचे मालक राजू बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे .

दरम्यान यापूर्वी देखील दोन वेळा सदर दुकानात चोरीचे प्रयत्न झाले होते . ऐन सणासुदीच्या दिवसात झालेल्या चोरीमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे .