GM NEWS : ग्रेट मराठी न्यूज : क्रीडा वृत्त : अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी विद्यार्थ्यांनी घेतले कमांडो प्रशिक्षण . शेंदुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व पहुर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम . आत्मसंरक्षणासह विद्यार्थ्यांनी गिरवले पर्यावरण संवर्धनाचे धडे . मोबाईलपासून दूर जात विद्यार्थी रमले डोंगराच्या कुशीत .

0
381

पहूर , ता .जामनेर (शंकर भामेरे ) येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी आणि शेंदुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा काल शनिवारी मोठ्या उत्साहात समारोप झाला .

  शालेय विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षणासह राष्ट्रभक्ती , निसर्ग प्रेम , परस्पर सहकार्य , सामंजस्य , नेतृत्व कौशल्य आदी गुणांचा विकास व्हावा यासाठी गेल्या २२ वर्षांपासून अजिंठा डोंगर रांगेत रुद्रेश्वर लेणीच्या जवळ वेताळवाडी परिसरात डोंगराच्या पायथ्याशी पाच दिवसीय कमांडो ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे .कॅम्पचे प्रणेते व प्रशिक्षक श्रीकृष्ण चौधरी , शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक हरिभाऊ राऊत , सोयगाव येथील कराटे प्रशिक्षक करीम देशमुख यांनी विद्यार्थ्यांना कराटे , तायक्वांदो , ट्रेकिंग , रायफल शूटिंग , घोडे स्वारी , स्विमिंग , जंगल सफारी , धनुर्विद्या आदी कला कौशल्यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले .

या कॅम्पमध्ये 53 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . 

खानदेशचे सुपरस्टार सचिन कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ आयोजित करण्यात आला .प्रारंभी भारत माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . यावेळी शेंदुर्णीचे उपनगराध्यक्ष श्री . थोरात , शंकर भामेरे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले , प्रशिक्षणार्थी आकांक्षा जाधव हिने गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली . यावेळी प्रकाश जोशी , संदीप बेढे , निलेश प्रजापत , अण्णासाहेब निकम यांच्यासह पहूर शेंदुर्णी सोयगाव परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यशस्वीतेसाठी कु . लोचना चौधरी , ईश्वर क्षीरसागर , भूषण मगरे , हर्षल उदमले , कडूबा महाराज यांच्यासह सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी सहकार्य केले .