GM NEWS,FLASH:बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे .कृषि विभागाचे आवाहन !

0
232
  1. जळगाव, दि. 26, ( मिलींद लोखेडे ) : – शेंदरी/गुलाबी बोंड अळींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी/ रोखण्यासाठी तसेच पुढील वर्षी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस पीकाची फरदड घेऊ नये. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
    त्याचबरोबर कापूस पीक शेतातून माहे डिसेंबर अखेर पुर्णत: काढून टाकावे. त्यानंतर 5 ते 6 महिने शेत पुर्णपणे कापूस विरहित ठेवल्यास शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येवून पुढील हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. शेंदरी बोंड अळी डिसेंबर महिन्यानंतर खाद्य उपलब्ध नसल्यास सुप्त अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहून पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावरही तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो.
    कापसाच्या पिकाचा हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये शेळ्या, मेंढ्या तसेच इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत. तसेच कपाशीच्या पऱ्हाट्यांमध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने गंजी करून शेतबांधावर ठेवू नये, पीक काढणीनंतर पऱ्हाट्या, व्यवस्थित न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी, त्यामुळे जमिनीवर आलेले किडींचे कोष तसेच इतर अवस्था नष्ट होतील. जिनींग-प्रेस मिल तसेच कापुस साठवण केलेल्या जागी प्रकार सापळे, कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. जेणेकरून तेथे अस्तीत्वात असलेल्या शेंदरी /गुलाबी बोंडअळींना नष्ट करता येईल .
    तरी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस शेतातील कापूस पऱ्हाट्या व त्याचा पालापाचोळा पुर्णपणे नष्ट करून कापसाची फरदड घेवू नये. असेही श्री. ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.