GM NEWS,दिन विशेष : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता.

0
154

भारतीय घटनेचे शिल्पकार, धर्मशाशास्त्र, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक ,द्रष्टे विचारवंत, विविध सामाजिक चळवळींचे जनक असणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आजही प्रेरक अशीच आहे. ३१ जानेवारी १९२० रोजी त्यांनी “मूकनायक” वृत्तपत्र सुरू केले.या ऐतिहासिक घटनेस १०० वर्षे होत आहेत.
या निमित्ताने त्यांच्या पत्रकारितेची ओळख…..

दलित पत्रकारितेचा प्रारंभ :
गोपाळ बाबा वलंगकर यांनी १८८८ मध्ये पत्रकारितेस सुरुवात केली होती. २३ ऑक्टोबर १८८८ रोजी त्यांनी ”विचार विध्वंस” नावाची पुस्तिका लिहिली होती. समाजाने निर्माण केलेल्या दृष्टचक्रातून अस्पृश्य वर्गाला बाहेर काढण्याचा ध्यास त्यांना लागलेला होता. दलित समाजातील ते पहिले पत्रकार होते. त्यानंतर शिवराम जानबा कांबळे यांनी ”सोमवंशी मित्र” हे पहिले साप्ताहिक प्रकाशित केले. पूर्णपणे स्वत:चे अग्रलेख लिहिणारे ते पहिले दलित पत्रकार होते. किसन फागु बंदसोडे यांनी “निराश्रीत हिंद नागरिक “हे पत्र १९१०साली ,”विटाळ विध्वंसक” १९१३ व १९१८साली ”मजूर पत्रिका” अशी तीन वृत्तपत्रे सुरु करुन त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले. बंदसोडे यांनी पत्रकारितेमध्ये नवीन आदर्श निर्माण केला. विदर्भातील गणेश गवई यांनी १९१४ साली ”बहिष्कृत भारत” हे वृत्तपत्र काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी सरकारने १९१७ साली साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे, असे वाटले. ”पंखाशिवाय जसा पक्षी, त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते” हे त्यांना तीव्रपणे जाणवत होते . उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी, अस्पृश्यांवर बहुतांशी अन्याय करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या माध्यमाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे :
(१) मूकनायक : समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी त्यांनी ‘मुकनायक’ पाक्षिक वृत्तपत्र ३१ जानेवारी, १९२० रोजी सुरू केले. मूक अस्पृश्यांचे नायकपण आपण स्वीकारल्याचे त्यांनी जाहीर केले. मूकनायकाने त्यांच्या पुढील घणाघाती चळवळीची जणू नांदीच म्हटली.
राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य त्यांना लाभले होते.
पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये ते म्हणतात,
”आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाय योजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्राकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीची हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही प्रलाप त्यातून निघतात. अशा वृत्त पत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींना बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारुने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा , जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले ,तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जल समाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये.”
मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर पुढील बिरुदावली असे,
“काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||१||
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||२||”
तुकारामाच्या या ओळी त्यांनी बिरुदासाठी निवडाव्या, यात केवढे तरी औचित्य आहे. वृत्तपत्राचे ‘मूकनायक’ हे नावही त्यांना ”नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण” या चरणावरुन सुचले असावे.
बाबासाहेब परदेशी गेल्याने १९२३मध्ये ‘मूकनायक’ बंद पडले.
२) बहिष्कृत भारत :
बहिष्कृत भारत हे पाक्षिक त्यांनी ३एप्रिल १९२७ रोजी सुरू केले . या पाक्षिकाचे ते स्वत: संपादक होते. दुसऱ्या अंकापासून बहिष्कृत भारतावर बिरुदावली म्हणून ज्ञानदेवांच्या पुढील ओव्या असत,
“आता कोंदड घेऊनि हाती |आरुढ पांइये रथी |
देई अलिंगन वीरवृत्ती |समाधाने |
जगी कीर्ती रुढवी | स्वधर्माचा मानु वाढवी |
इया भारापासोनि सोडवी | मेदिनी हे |
आता पार्थ नि:शंकु होई | या संग्रामा चित्त देई |
एथ हे वाचूनि काही | बोलो नये |
आता केवळ संग्राम |संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही |”
अशी प्रेरणा ते प्रारंभापासून चेतवीत .
या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वत: लिहित.या वृत्तपत्राचे खूप वर्गणीदार झाले नाही. तसेच कायमची आर्थिक तरतूद करणे बाबासाहेबांना शक्य झाले नाही. ईतर सर्व व्यापातापामुळे बहिष्कृत भारत १५ नोव्हेंबर, १९२९ रोजी बंद पडले. या पाक्षिकाचे एकूण ३४अंक निघाले. त्यातला ४जानेवारी १९२९चा अंक सोडता सर्व अंकात अग्रलेख आहेत. ३१अंकांमध्ये ”प्रासंगिक विचार” या सदरामध्ये त्यांनी विविध विषयांवर लिहिले आहे. त्यांच्या स्फूट लेखांची संख्या १४५ आहे.
बहिष्कृत भारतच्या पहिल्या अंकात बाबासाहेब म्हणतात :
“सुधारणेचा कायदा अंमलात आला आहे. इंग्रजांच्या हातची सत्ता काही प्रमाणात वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे. बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधीच्या बाबतीत मुळीच दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याचा निर्दयी धनी कसाबाच्या स्वाधीन करतो, त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या मायबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केले आहे. अस्पृश्यांची स्थिती सहा वर्षापर्वूीपेक्षा आज जास्त शोचनीय आहे. ही शोचनीय स्थिती जगजाहीर करुन होत असलेली हेळसांड टाळावयाची असेल , घडत असलेल्या अन्यायापासून , जुलुमापासून बचाव करावयाचा असेल तर वृत्तपत्राची जरुरी सहा वर्षापूर्वीपेक्षा आज अधिक तीव्र आहे.
बहिष्कृत वर्गाच्या लोकांना जर त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले नाही, तर त्यांच्या उन्नतीची इतिश्री झाली ,असेच समजावे. कारण ब्रिटिश सरकारचे नि:पक्षपाती धोरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठरवले जाईल, इतकी त्यांची मनोभूमिका शुद्ध व सात्विक बनलेली नाही. हा घोर प्रसंग टाळावयाचा असेल तर, आतापासूनच चळवळीला सुरुवात केली पाहिजे.”
हे वृत्तपत्र१९६१ साली बंद पडले.
३) जनता :
जनता वृत्तपत्राचा पहिला अंक २४नोव्हेंबर १९३० रोजी प्रकाशित झाला. श्री. देवराव विष्णू नाईक हे संपादक होते. “जनता “प्रारंभी पाक्षिक होते. ३१ ऑक्टोबर १९३१ पासून ते साप्ताहिक झाले.
या वृत्तपत्राची बिरुदावली ”गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा ,म्हणजे तो बंड करुन उठेल” अशी होती. बाबासाहेबांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेच पण विशेष म्हणजे त्यांनी परदेशातून लिहून पाठविलेली पत्रे “जनता”त प्रकाशित झालीत.
जनता १९५५सालापर्यंत सुरु होते. या वृत्तपत्राचे संपादक वेळोवेळी बदलले. कधी प्रकाशनात अनियमितपणा निर्माण झाली. पण तरी ते खूप दिवस टिकले. ४ फेब्रुवारी १९५६ रोजी जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्फूट लेखन :
प्रासंगिक प्रश्नावर लेख हे साधारण स्फूट लेखनाचे स्वरुप असते. स्फुट लेखनाला विषयांची मर्यादा नसली तरी विस्तार मर्यादा निश्चित असते. अशा स्फुट लेखनात लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे, त्याच्या जीवनदृष्टीचे, चिकित्सकतेचे आणि त्याच्या विचार वैशिष्ट्याचे प्रतिबिंब उमटत असते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूट लेखन प्राधान्याने ‘बहिष्कृत भारत’मध्ये आढळते. ‘जनता’ आणि ‘प्रबुद्ध भारतात’ स्फूट लेखन प्रकाशित होत असले तरी ते डॉ. बाबासाहेबांचे नव्हते. बहिष्कृत भारताच्या १९२७ सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात ”आजकालचे प्रश्न” या सदरांतर्गत तर दुसऱ्या वर्षी ‘प्रासंगिक विचार’ या सदराखाली त्यांचे स्फूटलेखन प्रकाशित झाले आहे.
बालविवाहाचे फलित, ब्राम्हण्याचे स्वरुप, वर्णाश्रमाचा प्रभाव, मंदिर प्रवेश, मातंग समाज, शुद्धिकार्य, सत्याग्रह, आर्य समाजाचे कार्य, मनुस्मृती दहनाचे वादळ, सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद, सहभोजन, मजूर पक्ष, मिश्रविवाह, हिंदीकरण, देव, पुजारी व भक्त क्रांती, रोटी व्यवहार व बेटी व्यवहार, भिन्न वसाहती, व्यक्ति, सायमन कमिशन अशा अनेक विषयांवर बाबासाहेबांनी लेखन केले.
डॉ. आंबेडकरांची वृत्तपत्रे आणि चळवळी :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या वृत्तपत्रातून प्रमुख चळवळी यथार्थपणे चालविल्या. त्या अशा :
१) कोल्हापूर जवळ माणगाव येथे परिषद घेऊन बाबासाहेबांनी दलितांचे प्रश्न मांडले. राजर्षि शाहू महाराजांनी या परिषदेत डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाचे स्वागत करुन आपल्याकडून या समस्यांना गती मिळेल, असे अभिवचन दिले.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रह केला . त्याचे वर्तमान त्यांच्या बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात आले आहे.
३) नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा एक महत्वाचा टप्पा होता. या चळवळीचे प्रतिबिंब त्यांच्या वृत्तपत्रातून उमटले आहे.
४) डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करुन जातीव्यवस्थेला विरेाध केला.
५) सामाजिक न्याय चळवळीत त्यांनी येवला येथे १९३५ साली “आपण हिंदू जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” अशी घोषणा केली.
डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि सद्यस्थिती :
बाबासाहेब हे सव्यसाची पत्रकार होते. सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक न्याय या तत्वांचा
त्यांनी आग्रह धरलेला होता. त्यांची सर्व पत्रे याच ध्येयवादाने भारलेली होती. नैतिकता हा तर त्यांनी वृत्तपत्राचा कणाच मानला होता. वृत्तपत्र जर जनकल्याणाचे साधन असेल ,तर पीत पत्रकारिता ही निषेधार्हच मानली पाहिजे.
महाराष्ट्राला ध्येयशील पत्रकारितेची परंपरा आहे . म्हणून व्यथित अंत:करणाने पण परखडपणे आपल्या ध्येयापासून वंचित होणाऱ्या पत्रांना त्यांनी आपल्या मूळ बैठकांची जाणीव दिली. वृत्तपत्रांनी आचारसंहिता पाळली नाही आणि त्यांचे तंत्र स्वैर असले, तर अज्ञ जन रानभेरी होतील ,असे त्यांना वाटे .
भडक, विकृत आणि भावनांना आवाहन करणारे लेख लोकमानस घडवू शकणार नाहीत, लोकजीवनाला नवे परिणाम देऊ शकणार नाही ,अशी त्यांची खात्री होती. वृत्तपत्राचा खप वाढणे म्हणजे लोकमनाला संस्कारित करणारी विधायकता नव्हे. नि:पक्षपातीपणाचा अभाव आणि न्यायोचित लोककल्याणाच्या विचारांशी फारकत, लोकमनाची व लोकमताची अविकृत जडण घडण करु शकत नाही, असा त्यांचा ठाम विचार होता. वृत्तपत्र हे शोषणाचे माध्यम बनविणाऱ्या प्रवृत्तींना त्यांनी धारेवर धरले होते .
त्यांच्या मते व्यक्ति पूजा ही भारतातील अनेक पत्रांना लागलेली कीड आहे. व्यक्ति पूजा आंधळी असते. त्यामुळे नितिमत्ता ढळते .म्हणून वृत्तपत्रांनी नितीमत्तेला बाधा येणार नाही आणि सत्यापलाचा सूर बदलणार नाही ह्याची काळजी घेतली पाहिजे. वृत्तपत्र प्रपंच म्हणजे नितिमत्तेचा प्रपंच अशी त्यांची धारणा होती.
जाहिरातीशिवाय वृत्तपत्रे जगू शकत नाही ,हे खरे असले तरी वृत्तपत्रांनी जाहिरातीच्या आहारी जावे का? आणि कितपत जावे ? आर्थिक कारणांसाठी जाहिराती आवश्यक असल्या, तरी कोणत्या जाहिराती प्रकाशित कराव्यात या संबंधी संहिता पाहायला हवी, असे ते म्हणत. जाहिरातीची उद्दिष्टे आणि जाहिरात करण्याची पद्धती यात विरोध निर्माण झाला की, जाहिराती करण्यामागील तत्व भ्रष्ट होते, असा त्यांचा दावा असे. जाहिरात आणि नितिमत्तेचा संबंध बाबासाहेबांना अपरिहार्य वाटे. समाज उन्नतीचे साधन म्हणून त्यांनी वृत्तपत्राकडे पाहिले. लौकिक ऋण फेडण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा प्रभावीपणे वापर केला.
बाबासाहेबांची पत्रकारिता या विषयावर डॉ. गंगाधर पानतावणे व डॉ.विजया इंगोले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आलेली आहे. पानतावणे सरांचे संशोधन ग्रंथरुपाने प्रकाशित झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेले विचार, भूमिका आजही तंतोतंत लागू पडते, यावरुनच त्यांची दूरदृष्टी आणि विचारांची खोली दिसून येते. ******************
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट :
१९९१, एप्रिल १४ , जन्म : महू, मध्यप्रदेश.
१९०० ,नोव्हेंबर – सातारा येथील शासकीय विद्यालयात प्रवेश.
१९०८ ,जानेवारी – मुंबई विद्यापीठाची मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण.
१९१३, जानेवारी – पर्शियन आणि इंग्रजी घेऊन बी.ए. १९१३,जुलै – अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात (न्युयार्क) सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन अभ्यासक्रमासाठी दाखल.
१९१५ – अर्थशास्त्र हा प्रधान विषय घेऊन एम.ए.
१९१६ ,मे- ”दि कास्ट इन इंडिया” या निबंधाचे वाचन. हा त्यांचा पहिला प्रकाशित निबंध.
१९१६ ,जून – स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पोलिटिकल सायन्स, लंडन येथे दाखल.
१९१७– कोलंबिया विद्यापीठात पीएचडी पूर्ण.
१९१७- “स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया अँड देअर रेमिडिज” प्रकाशित.
१९१८,नोव्हेंबर – मुंबईच्या सिडेनहॅम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले.
१९२०,जानेवारी- ”मूकनायक” सुरु केले.
१९२१,जून – लंडन विद्यापीठाची एमएसस्सी ही अर्थशास्त्रातील पदवी मिळवली.
१९२३, मार्च –”दि प्रॉब्लेम ऑफ रुपी” या प्रबंधाला अर्थशास्त्रातील डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी.
१९२६– मुंबई शासनात एम.एल.सी म्हणून नियुक्ती.
१९२६,मार्च – महाड येथे चवदार तळे सत्याग्रह
१९२७, एप्रिल – बहिष्त भारत सुरु केले.
१९२८, जून – सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यापक.
१९३० – जनता पत्र सुरु केले.
१९३० ते १९३५ – नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह.
१९३० ते ३२-गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सहभागी.
१९३२,सप्टेंबर – पुणे करार. १९३५,जून – मुंबईच्या सरकारी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य.
१९३५,ऑक्टोबर – हिंदु धर्मत्यागाची येवला येथे घोषणा.
१९३६,ऑगस्ट – स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
१९४५,जुलै – पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
१९४६,ऑक्टोबर –”हू वेअर शुद्राज” प्रकाशित.
१९४७,ऑगस्ट – भारतीय घटना समितीचे अध्यक्ष.
१९४७,ऑगस्ट – स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री.
१९४९, नोव्हेंबर – भारतीय संविधान सादर.
१९५०, जून – औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना. १९५२,मार्च – कोलंबिया विद्यापीठाने एलएलडी पदवी दिली.
१९५५, मे – भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
१९५५ – प्रबुद्ध भारत सुरु केले.
१९५६,ऑक्टोबर १४ –नागपूर येथे बौद्धधर्माचा स्विकार.
१९५६,नोव्हेंबर – जागतिक बौद्ध परिषद,काठमांडू ,नेपाळ ,येथे प्रतिनिधी म्हणून हजर.
१९५६,डिसेंबर ६– दिल्ली येथे महापरिनिर्वाण .
१९५७–”बुद्ध अँड हिज धम्म” ग्रंथाचे प्रकाशन

***********

संदर्भसूची :
१. रणपिसे अप्पा, दलितांची वृत्तपत्रे, प.१-२.
२. पानतावणे गंगाधन, पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रतिमा प्रकाशन, पुणे, १९९६, पृ. ६,२३९,२४०,२४१,२४७,२४८.
३. कानडे रा. गो., मराठी नियतकालिकांचा इतिहास, कर्नाटक – मुंबई, १९३४, पृ. ३.
४. हिवराळे सुखराम, लोकपत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९०, पृ.९.
५. आढावे प्रशांत, माध्यम संशोधन पत्रिका
६. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विलायतेहून आलेली पत्रे – रमेश रघुवंशी पृ. १,२.
७. निबंधकार डॉ. आंबेडकर, डॉ. यशवंत मनोहर, प. १८,१९,२०,२१,२२,२३,१०४,१०
४.
८. डॉ. आंबेडकर विचारमंथन, डॉ. वा. ना. कुबेर, पृ. १७,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२५,२६,२७,२८.
लेखक : श्री .देवेंद्र भुजबळ
से.नि.माहिती संचालक महाराष्ट्र शासन         Email:-     devendrabhujbal4760@gmail.com

संकलन – श्री .मिलींद लोखंडे
एम.ए. ( जनसंवाद व पत्रकारीता)