प्लास्टीक ध्वज विक्रीस बंदी .उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी यांचे निर्देश .

80

जळगाव. दि. 11 ( मिलींद लोखंडेेेे ):-दरवर्षी 26 जानेवारी, 1 मे, व 15 ऑगस्ट रोजी तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी व नागरीकांकडून मोठ्या प्रमाणावर छोट्या कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम संपल्यानंतर फाटलेले, खराब झालेले राष्ट्रध्वज रस्त्यावर, कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले आढळतात, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होते. राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्यासाठी, राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याने स्थानिक पातळीवर स्वंयसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या व प्रसार माध्यमे यांचे सहकार्य घेऊन राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत जनजागृती करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
प्लास्टीकचे विखुरलेले राष्ट्रध्वज बरेच दिवस नष्ट होत नसल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टिने ही बाब अतिशय गंभीर अशी आहे. ध्वजसंहितेनुसार तसेच केंद्र शासनाकडील गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लास्टीकच्या वापराबाबत मान्यता नाही. त्यामुळे अशाप्रकारे प्लास्टीकचे ध्वज उत्पादन वितरकांवर बंदी आणावी. तसेच विक्री करणा-यांना प्लास्टीकचे ध्वज विक्री करणेस प्रतिबंध करावा व उल्लंघन करणा-यांवर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. अशा सुचना श्री. वामन कदम, अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यकारी दंडाधिकारी, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना दिल्या आहे.
येत्या 15 ऑगस्ट, 2019 च्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शासन परिपत्रकात दिलेल्या सूचनांनुसार राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्थानिक पातळीवर स्वंयसेवी संस्था, विद्यार्थी, केबल वाहिन्या व प्रसार माध्यमे यांचे सहकार्य घेऊन जनजागृती करावी, तसेच खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज विद्यार्थी, युवक मंडळे, क्रिडा मंडळे, स्वंयसेवी संस्था यांच्या मदतीने गोळा करुन त्याची ध्वजसंहितेमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार विल्हेवाट लावावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा या संदर्भात शासनामार्फत व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच जाणिवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950 व राष्ट्रीय अवमान कायदा 1971 तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध असल्याचेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री कदम यांनी या पत्रात म्हटले आहे.
०००