GM NEWS, शैक्षणीक वृत्त: राज्यातील आश्रमशाळां मधील विद्यार्थ्यासाठी “अनलॉक लर्निंग’ . विद्यार्थ्यांना मिळणार घरपोच ‘लर्निंग कीट’

0
263

तळेगांव,ता. जामनेर,दि.२२ ( डॉ. गजानन जाधव ) : – विद्यार्थ्यांच होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे “अनलॉक लर्निंग’चा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नियोजनानुसार कामकाज सुरू झाले असून, उपक्रमाचा पहिला टप्पा एक जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत असणार आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित आश्रमशाळांचे प्रथम सत्र “लॉक डाउन’मुळे अद्याप सुरू झालेले नाही. सर्व विद्यार्थी घरीच आहेत. हा लॉक डाउन कालावधी कधी संपणार, हे अनिश्‍चित आहे. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे “अनलॉक लर्निंग’चा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नियोजनानुसार कामकाज सुरू झाले असून, उपक्रमाचा पहिला टप्पा एक जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत असेल.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी शिकविलेल्या मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, परिसर अभ्यास या विषयांच्या मूलभूत क्षमतांवर आधारित कार्यपुस्तिका, सहशालेय उपक्रमासाठी कृतिपुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागातील कार्यरत तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी कार्यपुस्तिका, सहशालेय उपक्रमासाठी कृती पुस्तिकांची निर्मिती केली आहे. या पुस्तिकांची छपाई प्रकल्प स्तरावरून होणार आहे. यासाठी नाशिक येथील आदिवासी विकास विभाग कार्यालयाने “सॉफ्ट कॉपी’ दिली आहे. कार्यपुस्तिकेची प्रस्तावना अपर आयुक्त तथा प्रकल्प अधिकाऱ्यांची राहील. विहित कार्यपद्धतीचा अवलंब करीत विद्यार्थी संख्येनुसार छपाई केली जाईल. ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या घरी पुस्तिका रवाना केल्या जातील. कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थी, पालकांना पुस्तिका घेण्यासाठी शाळेत बोलावू नये, अशा सूचना आहेत. या शैक्षणिक उपक्रमात शिक्षकांना गावनिहाय आदिवासी विद्यार्थी दत्तक दिले जाणार आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने तयारी चालविली आहे.

“लर्निंग किट’ वाटपाचे नियोजन
आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांनी मोफत पाठ्यपुस्तक केंद्रप्रमुखांकडून प्राप्त केली आहेत. विद्यार्थ्यांना द्यावयाच्या किटमध्ये पाठ्यपुस्तके, वह्या, कार्यपुस्तिका, पेन, पेन्सिल, खोडरबर, शापर्नर, स्कूल बॅगचा समावेश आहे. “लर्निंग किट’च्या वितरणासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गृहभेटीचे नियोजन करतील. यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन होणे आवश्‍यक आहे. कार्यवाहीचा अहवाल आयुक्त कार्यालयाला द्यावा लागणार आहे.

कार्यपुस्तिका अभ्यासक्रमात समाविष्ट विषय
इयत्ता दुसरी ः मराठी, इंग्रजी, गणित
तिसरी, चौथी (एकत्र) ः मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास
पाचवी, सहावी ः मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान
सातवी, आठवी ः मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान
नववी, दहावी ः मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान व तंत्रज्ञान
कृतिपुस्तिका ः दुसरी ते आठवीसाठी कला, क्रीडा कार्यानुभव, आरोग्य, स्वच्छता.