GM NEWS :खळबळजनक वृत्त: जामनेर तालुक्यातील पहूर येथे अवैध धंद्यांवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी . दगडफेकीत पाच तरूण जखमी ; मेडिकल मेमो घेऊन सुटलेले पाचही तरूण पुन्हा सकाळी आले आमने सामने ;घुसफुस कायम . पोलीस कारवाई कडे ग्रामस्थांचे लक्ष .

0
1102

पहूर, ता. जामनेर दि .२२( प्रतिनिधी) : – पहूर येथील लेले नगर भागात दारू विक्रीच्या कारणावरून दोन गटातील धुसफुस अजूनही कायम आहे . काल रात्री तुंबळ हाणामारी झाल्यानंतर पोलीसांनी पाच तरुणांना ताब्यात घेतले खरे मात्र ते सर्व जखमी झाले असल्याने मेडीकल मेमो देऊन त्यांना सोडण्यात आले .परंतु सकाळ होताच आज पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आले . आता पुन्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की , काल रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अवैध धंद्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली.यात लोखंडी रॉड काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात येऊन दगडफेकही झाली .पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे घटनास्थळी दाखल होताच त्यांनी गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला .घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी हेही आपल्या ताफ्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी या प्रकरणी दिपक प्रभाकर कुमावत, नितीन पांढरे, सचिन पांढरे, सतिश प्रभाकर कुमावत, शाम प्रभाकर कुमावत या पाच संशयीतांना ताब्यात घेतले .
ते सर्व जण जखमी झाल्याने त्यांना पोलीसांनी मेडिकल मेमो देऊन रात्रीच सोडून दिले .

….आणि सकाळीच पुन्हा
वादाला फुटले तोंड

‘मेडिकल मेमो ‘च्या आधारे रात्री घरी आलेले सर्व आरोपी सकाळ होताच पुन्हा आमने-सामने आले . यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती .काही काळ तणावाचे वातावरण होते . नेहमीप्रमाणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि ‘त्या ‘ पाचही जणांना ताब्यात घेतले .

अवैध धंद्यांचा सुळसुळाट –
या प्रकरणात जागेच्या वादाचे कारण समोर दाखविले जात असले तरी मुळ खदखद ही अवैध धंद्याची असल्याचे स्थानीक नागरिकांनी सांगीतले .पहूर येथील लेले नगरात गेल्या काही वर्षांपासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे . भरवस्तीत दारू , सटटयासारखे अवैध धंदे बिनबोभाट सुरू आहेत .यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून वाममार्गाला लागत आहे . विशेष म्हणजे चिमुकल्यांची अंगणवाडी , हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या हाकेच्या अंतरावर हे धंदे सुरू असून पहुर बस स्थानक ते पोलीस स्टेशन या मार्गावर सुरू असलेले हे धंदे पोलिसांना माहीत नसतील काय ? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे .

जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन –
कारवाई मात्र नाही

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 144 कलमान्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत .पहूर सलग दोन दिवस झालेल्या हाणामारीत मोठ्या संख्येने जमाव जमला होता . यामुळे जमावबंदीच्या आदेशाची पायमल्ली तर झालीच शिवाय सोशल डिस्टंसिंगचाही पुरता फज्जा उडाला . १४ तास उलटून देखील गुन्हेगारांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे .