सणउत्सवाचा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्येच्या दिवशी “बैलपोळा” या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सणाच्या स्वरूपात होते.
पोळ्याच्या दिवशी सकाळी मरीमातेला बोनं देऊन खर्या अर्थाने पोळा सणाची सूरूवात होते. त्या बोण्यातले अर्ध प्रसाद म्हणून पूलाजवळ नदि किनारी खाणं आणि नागझिरा जवळ उड्या मारणं… बैलांची गम्मत बघणे…. त्यांना धूणं…. हे आमच्यासाठी पर्वणीच असे.
विविध ठिकाणी या सणाला बेंदूर पोळा नंदीपोळा अशी नावे पडली आहेत.
आमच्या कडे गावी खादगावला मामा – भाचाची बैल जोडी होती.
पोळ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आमच्या ‘मोहन्या-रतन्या पाखर्या बैलांना पाहूण्या प्रमाणे खळ्यामध्ये नाना सोबत आमंत्रण दिलेलं मला आठवतं. सकाळी नदीत त्यांना आंघोळ घालून त्याच्या खांद्यांना तेला-तुपाने रगडून, मालीश केली जाई. . यानंतर त्यांची शिंगे रंगवत. गळ्यात गोंड्यांचे, फूलांच्या माळा घालून पायात घुंगरू बांधून अंगावर शाल टाकली जाई. ही सजावट झाली कि बैलाला घरी आणले जाऊन तिथे त्यांच्या पायावर पाणी टाकून पूरण पोळीचा प्रसाद दिला जात होता.
आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या बळीराजाच्या पाठीचा कणा म्हणजे बैल. या खास दिवशी बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा साजरा केला जातो.
दिवस-रात्र मेहनत करून हा शेतकरी जगाचा पोशिंदा बनतो. या पोशिंदाचा साथीदार म्हणजे त्याचा बैल त्याचा जिवलग साथीदार शेताच्या प्रत्येक कामात तो कष्ट करून बरोबरी ने आपल्या धन्या साठी राब राब राबत असतो. आपल्या बळीराजाला बळ देत असतो. पण त्याचे योगदानाची परतफेड म्हणून वर्षातून एका दिवशी म्हणजे आज त्याला पूजेचा मान देऊन नांगर यापासूनइतर सर्व कामां पासूण दूर ठेवले जाते….सालदाराला नवीन कपडे देवून पूरणपोळी चे जेवण दिले जाते.
मनोभावे त्याची सेवा केली जाते. ज्याच्याकडे बैल किंवा शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
भारतीय सण उत्सव हे सर्व समावेशक संस्कृतीचे खरे दर्शन घडवतात. प्राण्याला सुद्धा देवाप्रमाणे मान देणे याहून मोठा कृतज्ञताभाव सापडणारच नाही.
लेखक : – श्री . योगेश बाविस्कर
खादगांव ता . जामनेर .
मो : ९४२३३५९७५९