धुळे, दि. 1 ( मिलींद लोखंडे ) : – वाघाडी, ता. शिरपूर येथील रासायनिक कंपनीत शनिवारी सकाळी झालेल्या स्फोटाची सर्वंकष, सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार चौकशी करण्यात येईल. या स्फोटातील दोषींची गय केली जाणार नाही. मदत व बचाव कार्य सुरू असून त्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
वाघाडी येथील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. महाजन, अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आज सकाळी धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. यावेळी आमदार काशिराम पावरा, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार चंद्रशेखर देशमुख, सुदाम महाजन आदी उपस्थित होते.
मंत्री. श्री. महाजन यांनी सांगितले, या स्फोटाची चौकशी करण्यात येईल. दुर्घटनेच्या चौकशीसाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानांमार्फत सुरू झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपयांपर्यंतची मदत केली जाईल. तसेच जखमींच्या औषधोपचाराचा खर्च शासनामार्फत करयण्यात येईल. जखमींपैकी दोन जणांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर मंत्री श्री. महाजन, श्री. रावल यांनी वाघाडी गावात जावून ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच या घटनेतील मृत मनोज सजन कोळी याच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर मंत्री श्री. महाजन, श्री. रावल यांनी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली.
*वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची विचारपूस*
मंत्री श्री. महाजन, श्री. रावल यांनी धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जावून वाघाडी येथील दुर्घटनेतील जखमींची भेट घेवून त्यांची विचारपूस केली. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, खासदार डॉ. सुभाष भामरे, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये आदी उपस्थित होते.