GM NEWS, गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने संपविली जीवनयात्रा . सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ;पती पोलिसांच्या ताब्यात .

0
1441

पहूर , ता . जामनेर दि. १२ (शंकर भामेरे ) –

जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथे सासरच्या जाचाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली .याप्रकरणी पती , सासूसह सासरच्या ५ जणांविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की , जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथील शकील भिकन तडवी याच्याशी जांभोळ ,ता. जामनेर येथील रुक्सानाबी हबीब तडवी यांचा मागील वर्षी विवाह झाला . विवाहानंतर दोन-तीन महिने सासरच्यांनी रुक्सानाबी हिस चांगली वागणूक दिली ,मात्र त्यानंतर सासरच्यांनी तिला माहेराहून 50,000 रुपये आणण्यासाठी तगादा लावला .आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे 50 हजार रुपये ते देऊ शकले नाहीत, मात्र आमच्याकडे पैसे आल्यानंतर आम्ही देऊ असे म्हणून त्यांनी आपल्या मुलीला ‘दिल्या घरी सुखी रहा ……’असा कानमंत्र दिला . मुलगा झाल्यानंतर आपल्या मुलीचा संसार सुखात होईल असा भाबडा आशावाद त्यांचा होता .दरम्यान रुक्सानाबीचा सासरच्यांकडून वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच होता .
काल रात्री शनिवारी साडे दहाच्या सुमारास रुकसानाबीने आपल्या आईला पती कडून मारहाण झाल्याची घटना मोबाईलवरून कळवली .सकाळी आम्ही येतो असे सांगून माहेरचे लोक रात्री झोपी गेले, मात्र सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास माहेरच्यांनी फोन केला असता रुकसानाबीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना फोन वरून सांगण्यात आले . याप्रकरणी मयत रुकसानाबी तडवीच्या आई शकीला आबुदीन तडवी ( रा . जांभोळ ) यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात शकील भिकन तडवी ( पती ), तमीजाबाई भिकन तडवी ( सासू ), जुबेर भिकन तडवी ( जेठ ),परवीनबी जुबेर तडवी ( जेठाणी ) व शरीफ तडवी ( रा . सर्व गोंदगांव )या सासरच्या ५ जणांविरुद्ध भादंवी ३०६ / ४ ४८ ( अ ) ३२३ / ५०४ / ५०६ / ३४अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे करीत आहेत .पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून गोंदेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .
दरम्यान ,पतीने बेदम मारहाण करून पत्नीचा खून केल्याचा आरोप रुकसानाबीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे . या घटनेने गोंदेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

.