पहूर , ता . जामनेर दि . २८ (शंकर भामेरे ) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तर्फे मार्च २०२० घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेचा निकाल उद्या बुधवार, दि. २९ जुलै २०२० रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये पुणे ,नागपूर, औरंगाबाद ,मुंबई ,कोल्हापूर, अमरावती ,नाशिक ,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इ १० वी ) घेण्यात आली होती . या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर दुपारी १ वाजेनंतर पाहता येणार आहे .
mahresult.nic.in /
www.sscresult.mkcl.org/
www.maharashthraeducation.com/

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र साठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .यासाठी आवश्यक अटी ,शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत .गुण पडताळणीसाठी गुरुवार ,दि . ३० / ७ / २०२० ते शनिवार ,दि. ८ / ८ / २०२० पर्यंत व छायाप्रती साठी गुरुवार, दि. ३० / ७ / २०२० ते मंगळवार ,दि. १८ / ८ / २०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल .त्याच संबंधी शुल्क ऑनलाइन पद्धतीने नेट बैंकिंच्या माध्यमातून भरता येईल .

मार्च २०२०मध्ये झालेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळारून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून
छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासूनकार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्रमूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरूनसंबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील .ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेलत्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित मंडळाकडे संपर्क साधावा ,असे आवाहन मंडळ सचिव यांनी केले असून २०२०च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इ . १० वी . )सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी सुधार / गुण सुधारयोजने अंतर्गत उपलब्ध राहतील .
सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी जीएम न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा .