राष्ट्रीयकृत बॅकांनी जिल्ह्यात स्वयंरोजगार वाढीसाठी मदतीचे धोरण स्वीकारावे . -खासदार रक्षाताई खडसे .

0
224

जळगाव, दि. 4 ( मिलींद लोखंडे ) :- तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार उभारता यावे, याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी तरुणांना मुद्रा बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन दिल्यास जिल्ह्यात स्वयंरोजगार वाढीसाठी निश्चितपणे मदत होईल. याकरीता बँकांनी मदतीचे धोरण स्वीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर सभेचे सहअध्यक्ष म्हणून खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्याअध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, महापौर सिमाताई भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, सहायक प्रकल्प संचालक पी. पी. शिरसाठ आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खासदार खडसे म्हणाल्या की, शासनाच्या अनेक योजनांच्या लाभासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. नागरीकांना शासनाच्या योजनांच्या लाभासाठी बँकेत जावे लागते. नागरीक बँकेत गेल्यावर त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषत: मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज मागणीसाठी अर्ज केल्यानंतर तरुणांना आवश्यक ते मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. तसेच गरजूंना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध झाल्यास ते इतरांनाही रोजगार उपलब्ध करुन देतील. याकरीता बँकांनी सहकार्याची भावना ठेवण्याचे आवाहन श्रीमती खडसे यांनी केले. त्याचबरोबर बॅकांना काही अडचण असल्यास त्या सोडविण्याचेही आश्वासन दिले.

*अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून जनतेची कामे करावी*
– *खासदार उन्मेश पाटील*
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जनतेच्या अपेक्षा वाढत आहे. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करतांना शासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामांना गती देण्याबरोबरच संवेदनशील राहून नागरीकांची कामे करण्याचे आवाहन या सभेचे सहअध्यक्ष खासदार उन्मेश पाटील यांनी उपस्थितांना केले.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची पूर्ततात करतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाची निकड व जनतेच्या भावना लक्षात घेऊन काम करावे. जिल्ह्यातील दळणवळणास चालना मिळावी, जिल्ह्यात रस्ते व रेल्वेचे जाळे निर्माण व्हावे यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांची तसेच रेल्वेची कामे सुरु आहे. ही कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणेने काम करण्याची सुचना खासदार उन्मेश पाटील यांनी यावेळी केली. जिल्ह्यात दुध उत्पादन वाढावे याकरीता दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी तरुणांना मुद्रा योजनेतून कर्ज देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सुचनाही खासदार पाटील यांनी दिल्यात.
यावेळी खासदार पाटील यांनी जळगाव-चाळीसगाव, जळगाव-औरंगाबाद, जळगाव-धुळे, चाळीसगाव-नांदगाव या रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे, त्याचबरोबर जळगाव शहरातून जाण्याऱ्या राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी महानगरपालिका व महावितरण कंपनीने इलेक्ट्रीक पोल, पिण्याचे पाण्याची व सांडपाण्याची पाईप लाईन शिफ्टींगचे नियोजन करावे, राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्यावरील खड्डे व साईडपट्टया तातडीने भरण्याचे काम करावे. जिल्ह्यात पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेतंर्गत सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करा. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मंजूर घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा. घरकुलासाठी जागा उपलब्ध नसल्यास गावठाणामधील व शासकीय जागा उपलब्ध करुन देण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी जागांचे सर्व्हेक्षण करावे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे पूर्ण करणे, ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्रास आवश्यक सुविधा उपलबध करुन देणे, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतंर्गत सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करणे, विशेष सहाय योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरीकांना अनुदानाचे वाटप वेळेवर करणे, रुरबन मिशनतंर्गत निवड झालेल्या कामांचा प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सुचनाही खासदार श्री. पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिल्यात.
यावेळी खासदार श्री. पाटील यांनी जळगाव व भुसावळ शहरात सुरु असलेल्या अमृत पाणीपुरवठा व मल:निस्सारण योजना, रेल्वे विभागामार्फत सुरु असलेली कामे, सर्व शिक्षा अभियान, शालेय पोषण आहार, योजना, म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदि कामांचा आढावा घेतला.
*2 ऑक्टोबर रोजी सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबवा – जिल्हाधिकारी डॉ ढाकणे*
येत्या 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी होत आहे. याचे औचित्य साधून नागरीकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिलेत.
या बैठकीस वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे, पंचायत समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, महावितरणचे श्री. शेख, राष्ट्रीय महामार्गचे श्री. सिन्हा यांचेसह जिल्हा परिषदेचे व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 16 =